वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया दोन हजार बसेसवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया एक हजार 913 खासगी बसवर 20 लाख 30 हजार 242 दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. परिवहन कार्यालयामार्फत 17 एप्रिलपर्यंत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गांवर तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमेमध्ये 20 लाखांहून अधिक दंड व करवसुली करण्यात आली. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये तालुकानिहाय नेमलेल्या विशेष पथक व दोन नियमित पथकांमार्फत ज्या ठिकाणी अपघाताची तीक्रता जास्त आहे, अशा ठिकाणी विशेषतः हेल्मेट, सीटबेल्ट, अतिवेग, रॅश ड्रायव्हिंग, विना परवाना व थकीत कर असणारी वाहने, बसमधून मालवाहतूक करणारी वाहने व जादा भाडे आकारणी आदी गुह्यांसाठी वाहन तपासणी करून दोषी वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे तसेच खंडाळा येथे नेमलेल्या स्थायी पथकामार्फत खासगी व इतर बस, प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीरपणे थांबा घेऊन प्रवासी चढ-उतार करत असल्याने रस्ता वापर करणारे घटक यांना धोका उत्पन्न होतो. त्यावर विशेषत्वाने कारवाई करण्यात आली.

दोन फिरत्या पथकांमार्फत अपघातस्थळी तातडीने भेट देण्यासाठी व अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. याच ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी दुचाकी, चारचाकी चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगितले.