
सामना प्रतिनिधी, मुंबई
बीई आणि बीटेकसह इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया जेईई मेनची दुसरी ऑनलाइन परीक्षा 6 ते 20 एप्रिलदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी 8 फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे.
जेईई मेनचा निकाल नुकताच जाहीर झाला असून आता जेईई मेन 2च्या परीक्षेसाठी नोंदणी सुरू होणार आहे. ‘एनटीए’च्या वतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन 1 ही परीक्षा दिली असेल ते विद्यार्थीही जेईई मेन 2 ही परीक्षाही देऊ शकतात. जेईई मेन 1 आणि 2 या दोन्ही परीक्षांना बसण्याची संधी यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
जेईई मेन 1 आणि 2 या दोन्ही परीक्षांपैकी ज्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळतील त्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. जेईई मेन 2साठी नोंदणी 7 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे, तर 8 मार्चपर्यंत नोंदणी शुल्क भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल 30 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. https://jeemain.nic.in/ या वेबसाईटवर नोंदणी करता येईल.

























































