
कैलास मानसरोवर यात्रा येत्या 30 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. ही यात्रा पाच वर्षांनंतर सुरू करण्यात येत आहे. या यात्रेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली असून भाविक 13 मे 2025 पर्यंत नोंदणी करू शकतील. ही यात्रा 25
ऑगस्टपर्यंत सुरू राहील, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. भारत-चीन सीमावादामुळे सिक्कीममार्गे यात्रेचा प्रवास बंद करण्यात आला होता, परंतु आता दोन्ही देशांच्या परस्पर संमतीनंतर पुन्हा एकदा प्रवास सुरू करण्यात आला आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणी केल्याशिवाय कोणीही यात्रेला जाऊ शकत नाही. नोंदणी करणाऱ्यांसाठी अधिकृत वेबसाइट http://kmy.gov.in वर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्यांसाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत. अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक आहे. पासपोर्टची वैधता किमान 6 महिने असावी. 1 जानेवारी 2025 रोजी अर्जदाराचे वय किमान 18 ते 70 वर्षे असायला हवे. अर्जदाराच्या बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे.