रेखा जरे हत्याकांडातील सरकारी साक्षीदार डॉ. विजय मकासरे यांना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज दुपारी डॉ. मकासरे कामानिमित्त नगरकडे जात होते. शेंडी बायपासमार्गे एमआयडीसीकडे जात असताना विनानंबरच्या बुलेटवरून आलेल्या दोघा हेल्मेटधारी अज्ञात इसमांनी डॉ. मकासरे यांची कार अडवली. ‘तू रेखा जरे हत्याकांडात सरकारी साक्षीदार आहे ना? आमच्या बाजूने साक्ष दे. आमच्या विरोधात साक्ष दिल्यास तुला ट्रकनं उडवून देऊ,’ अशी धमकी देत ते अज्ञात निघून गेले. याबाबत मकासरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी अदखलपात्र गुह्याची नोंद केली आहे.