
सामना ऑनलाईन, बँकॉक
ग्लॅमरचे अंदाज, एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स आणि प्रतिष्ठेची काळी बाहुली कुणाच्या हाती जाते याची उत्कंठा… अशा वातावरणात रविवारी ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्याची रात्र रंगली. यामध्ये विद्या बालनचा ‘तुम्हारी सुलू’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर ‘हिंदी मीडियम’साठी इरफान खानने नाव कोरले. सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती अभिनेत्री रेखा. २० वर्षांनी रेखाचे दिलखेचक नृत्य बघण्याची संधी रसिकांना मिळाली. ‘दिल चीज क्या है’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘सलामे इश्क मेरी जा’ गाण्यांवर अप्रतिम नृत्य त्यांनी केले.
बँकॉकच्या सियाम निरामित थिएटरमध्ये काल रात्री आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. या वेळी रेड कार्पेटवर अवघे बॉलीवूड अवतरले. इरफान खान सध्या लंडनमध्ये न्यूरो एन्डोक्राइन टय़ूमर आजारावर उपचार घेत असल्याने तो पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. त्याचा पुरस्कार श्रद्धा कपूर हिने स्वीकारला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या स्पर्धेत रणबीर कपूर, आदिल हुसैन, राजकुमार राव, अक्षयकुमार यांची नावे होती. त्यांना टक्कर देत इरफानने पुरस्कार पटकावला. श्रीदेवी यांना जाहीर झालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांचे पती बोनी कपूर यांनी स्वीकारला.
नवाजुद्दीन झाला भावुक…
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ‘मॉम’ चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दिकी याला मिळाला. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या हस्ते नवाजुद्दीनने पुरस्कार स्वीकारला. या वेळी नवाजुद्दीन भावुक झाला. त्यांनी हा पुरस्कार श्रीदेवी यांना अर्पण केला.
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – साकेत चौधरी, हिंदी मीडियम
- सर्वोत्कृष्ट कथा – अमित मसूरकर, न्यूटन
- सर्वोत्कृष्ट गायक – अरिजीत सिंग (हवाएं-जब हैरी मेट सेजल)
- सर्वोत्कृष्ट गायिका – मेघना मिश्रा, मैं कौन हूं (सीक्रेट सुपरस्टार)
- सर्वोत्कृष्ट गीत- नुसरत फतेह अली खान, ए १ मेलोडी फना आणि मनोज मुंतशीर, मेरे रश्के कमर (बादशाहो)
- सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफीः- विजय गांगुली आणि रुएल डोसन वारिन्दानी, जग्गा जासूस
- सर्वोत्कृष्ट एडिटिंग- व्यंकट मॅथ्यू, न्यूटन
- सर्वोत्कृष्ट डॉयलॉगः हितेश केवल्य, शुभ मंगल सावधान































































