मोठ्या भावाचे दुसरे लग्न लावल्याप्रकरणी लहान भावाचा नातेवाईकांकडून खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । परभणी 

परभणीत मोठ्या भावाचे दुसरे लग्न लावून देण्यास मदत केली या कारणावरून लहान भावाचा पुतण्याने व त्याच्या पत्नीने खून केला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली.

अंबादास पावडे यांनी काही वर्षापूर्वी दुसरे लग्न केले होते. हे लग्न त्यांचा लहान भाऊ मधुकर पावडे यांनी लावून देण्यात मदत केली असा  संशय नातेवाईक व इतर भावांमध्ये होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात नेहमीच वाद होत असे. या वादाला कंटाळून अंबादास पावडे, मधुकर पावडे हे दोघे बंधू काही वर्षांपूर्वी येलदरी सोडून पाथरी येथे राहायला गेले. त्यांची शेती येलदरी पासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिकलागार या गावात आहे. गुरूवारी शेतीतील उसाचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खात्यावर जमा झाल्याचे त्यांना कळाले त्यावरून दोघे भाऊ येलदरी येथे आले. रात्री परत जाण्यास उशीर  झाल्याने ते चिखलागार येथे त्यांच्या शेतीचा बटाईदार विठ्ठल चव्हाण यांच्या घरी दोघा भावांनी मुक्काम केला शुक्रवारी सकाळी विठ्ठल चव्हाण यांचा दुचाकीवर बसून चिखलागार येथून जिंतूर कडे जात असताना पावणे दहा वाजण्याच्या सुमारास येलदरी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर त्यांच्या दुचाकीस पाठीमागून एकनाथ अंबादास पावडे याने रिक्षा गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे भाऊ खाली पडले असता एकनाथ पावडे याने हातातील धारदार शस्त्राने मधुकर पावडे यांच्या पोटावर,छातीवर जोरदार वार केले तर पद्माबाई पावडे यांनी अंबादास पावडे यांना जबर मारहाण केली. यावेळी इतर नागरिक घटनास्थळी जमा झाल्याने हल्लेखोर एकनाथ पावडे, पद्माबाई पावडे यांनी तेथून पळ काढला.

गंभीर जखमी झालेल्या मधुकर पावडे  यांच्यावर प्राथमिक येलदरी च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात  उपचार करून पुढील उपचारासाठी दाखल केले असता तिथेच निधन झाले. याबाबत अंबादास पावडे यांच्या फिर्यादीवरून एकनाथ पावडे, पद्माबाई पावडे या दोघांविरोधात जिंतूर पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.