एसटी अपघातातील पाच मृतांच्या नातेवाईकांना भरपाईची कवडी नाही; चार महिने उलटले तरी महामंडळाची चालढकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तारणे येथे झालेल्या एसटी अपघाताला चार महिने उलटून गेले तरी मृतांच्या नातेवाईकांना अद्याप नुकसानभरपाईची फुटकी कवडीही मिळालेली नाही. कागदपत्रांची सर्व पूर्तता करूनही महामंडळाने त्यांना फसवले असून या दिरंगाईबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. हक्काची नुकसानभरपाई देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने नातेवाईक एसटी महामंडळाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. अपघातातील मृतांना नुकसानभरपाई मिळत नसेल तर आम्ही जायचे कुठे, असा थेट सवाल नातेवाईकांनी केला आहे.

चार महिन्यांपूर्वी ८ मे रोजी तारणे येथील एका धोकादायक वळणावर तळा येथे जाणारी बस आगरदांड्याच्या दिशेने जाणाऱ्या डंपरला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. तृप्ती खुटीकर, लक्ष्मण ढेबे, अनन्या गव्हाणे, विठ्ठल कजबजे, अविनाश वजरे यांना प्राण गमवावे लागले. अपघातानंतर नियमानुसार एसटी महामंडळाकडून नुकसानभरपाई किंवा आर्थिक मदत अपेक्षित होते. नातेवाईकांनी पी फॉर्म भरून प्रशासनाकडे सर्व कागदपत्रे सादर केली.

अधिकाऱ्यांची टाळाटाळ
एसटीच्या अधिकाऱ्यांनी झालेल्या अपघाताची चौकशी करून त्याचे ऑडिटदेखील करण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांकडून प्रतिज्ञापत्रदेखील घेतले. चार महिने पाठपुरावा करण्यात आला तरीदेखील अजूनपर्यंत एक छदामही मिळालेला नाही. दरम्यान एसटी अपघातात माझी बहीण मृत्युमुखी पडली. त्यावेळी जाहीर केलेली मदत चार महिने उलटूनही मिळालेली नाही. एसटी प्रशासनाकडून टाळाटाळीची उत्तरे दिली जात आहेत असा आरोप मृताचे नातेवाईक अविनाश खुटीकर यांनी केला आहे.

वरिष्ठांच्या आदेशानंतरच पुढील निर्णय
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. वरिष्ठांच्या आदेशानेच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे एसटीच्या रामवाडी विभागाचे वाहतूक नियंत्रक प्रबोध राखाडे यांनी सांगितले.