
हिंदुस्थानी लष्कराने पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या कारवाईसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे कोडनेम वापरले. ‘ऑपरेशन सिंदूर’चा ट्रेडमार्क आपल्या नावे करण्यासाठी आता अनेक जणांमध्ये स्पर्धा लागलेय. यासंदर्भात कालपासून पाच अर्ज ट्रेडमार्क रजिस्ट्री ऑफिसकडे आले. यामध्ये मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अर्जाचाही समावेश होता. मात्र काही तासांतच रिलायन्स कंपनीने जिओ स्टुडियोचा आपला अर्ज मागे घेतल्याचे जाहीर केले.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड व्यतिरिक्त मुकेश चेतराम अगरवाल, जम्मूचे ग्रूप कॅप्टन (निवृत्त) कमल सिंह ओबेरह, दिल्लीचे आलोक कोङ्गारी, जयराज टी. आणि उत्तम यांनीही ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वेबसाईटवरून ही माहिती उपलब्ध झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ट्रेड मार्कसह चित्रपट, शो, कॉन्सर्ट, गेम्स किंवा ऑडिओ-व्हिडिओ कंटेंट तयार करणे, प्रकाशन सेवांमध्ये याचा वापर करण्याची परवानगी असेल.
रिलायन्सने या ट्रेडमार्कसाठी 7 मे रोजी म्हणजे ज्या दिवशी लष्करी कारवाई झाली, त्या दिवशीच ‘क्लास 41’ अंतर्गत अर्ज केला. वाणिज्य मंत्रालयाच्या ट्रेडमार्क सर्च पोर्टलनुसार, हे नाव मनोरंजनासाठी वापरण्याचा कंपनीचा मानस होता. मात्र रिलायन्स कंपनीने हा अर्ज आज मागे घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’ला ट्रेडमार्क करण्याचा रिलायन्स इंडस्ट्रीजचा कोणताही हेतू नाही, असे कंपनीने सांगितले. एका ज्युनिअर व्यक्तीने अनावधानाने परवानगीशिवाय ट्रेडमार्क अर्ज दाखल केला होता, असे स्पष्टीकरण आज कंपनीने दिले. याबाबत निवेदन देताना रिलायन्स इंडस्ट्रीने म्हटलं की, ‘ऑपरेशन सिंदूर’वर आम्हाला सार्थ अभिमान आहे. ते सशस्त्र दलाचे मोठे यश आहे.दहशतवादाविरोधातील हिंदुस्थानच्या संघर्षाचे प्रतीक आहे. या लढय़ात रिलायन्स परिवार पूर्णपणे आपले सरकार आणि सशस्त्र दलासोबत आहे. ‘इंडिया फर्स्ट’ या ब्रीदवाक्याप्रति आमची कटिबद्धता कायम आहे.