
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने शुक्रवारी जिओच्या युजर्ससाठी नव्या मंथली ‘ऑल इन वन’ प्लानची घोषणा केली आहे. या प्लॅनची किंमत 75 रुपयांपासून 185 रुपयांपर्यंत आहे. हे नवे प्लॅन आधीपासून असलेल्या प्लॅनसोबत मिळणार आहेत. या नवीन प्लॅनमध्ये जिओ टू जिओ फ्री कॉलिंगची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच नॉन जिओ कॉलिंगसाठी 500 मिनिटांची मर्यादा असेल.
सर्वात स्वस्त असलेल्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 जीबीचा डेटा महिन्याभरासाठी मिळणार आहे. तर 125 रुपयांमध्ये 14 जीबी,155 रुपयांमध्ये 28 जीबी आणि 185 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 जीबीचा डेटा महिन्याभरासाठी मिळणार आहे. या सर्व प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. इतर प्रतिस्पर्धी कंपन्याच्या तुलनेच 25 पट जास्त डेटा देत असल्याचे जिओने पत्रकात म्हटले आहे.
याआधी सोमवारी जिओने ग्राहकांसाठी चार नव्या टेरिफ प्लॅनची घोषणा केली होती. ते प्लॅन 222, 333, 444 आणि 555 रुपयांचे आहेत. त्यात 28, 56 आणि 84 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. तसेच त्यात 56,112,168 जीबी डेटा मिळणार आहे. हे सर्व प्लॅन ऑफ नेट आययूसी मिनिटांसोबत येतात. त्यामुळे दुसऱ्या नेटवर्कला कॉल करण्याची सुविधाही त्यात आहे. हे प्लॅन घेण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त 80 रुपये द्यावे लागणार आहेत.























































