
सामना प्रतिनिधी । मुंबई
कामावर कायम ठेवावे यासाठी न्यायालयात दाद मागणाऱया कंत्राटी कामगारांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. ठाणे औद्योगिक कोर्टात याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा निर्णय लागेपर्यंत २२८५ कंत्राटी कामगारांना कामावरून काढू नका असे आदेश हायकोर्टाने आज महावितरणला दिले. तसेच या कामगारांचा पगार नियमित सुरू ठेवा, असेही न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते यांनी महावितरणला बजावले.
२०१२ साली विद्युत सहाय्यक पदासाठी महावितरणकडून ७००० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. लाइन हेल्पर या पदासाठी दहा हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली. नवीन भरतीनंतर काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. याविरोधात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार सेनेने ठाणे औद्योगिक कोर्टात आव्हान दिले. औद्योगिक कोर्टाने कामगारांचे म्हणणे योग्य असल्याचे स्पष्ट केले, परंतु याबाबत कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे कामगारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीत हायकोर्टाने ठाणे औद्योगिक कोर्टात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत या कामगारांना कामावरून काढू नये असे आदेश दिले.






























































