
अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी आज पुण्यात सीआयडीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी तपासाच्या व्याप्तीबाबत सविस्तर माहिती दिली. सदर अकस्मित मृत्यूच्या तपासात तीन प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रामानंद म्हणाले, “रॅश आणि निग्लिजंट अॅक्ट झाला का, हा तपासाचा एक भाग आहे. त्याचबरोबर कोणते गुन्हेगारी कृत्य घडले का, ज्याला इंग्रजीत ‘इलीगल ओमिशन’ असे म्हणतात, किंवा इतर कोणतीही गुन्हेगारी बाब आहे का, हेही तपासाच्या कक्षेत आहे. थोडक्यात, क्रिमिनल कॉन्सपिरसी (कट), क्रिमिनल निग्लिजन्स (रॅश-निग्लिजंट कृती) आणि इतर कोणतेही गुन्हेगारी कृत्य यांची तपासणी सुरू आहे.”
तपासात अनेक संस्थांचे सहकार्य
सदर अकस्मित मृत्यूचा तपास पहिल्या क्षणापासून अत्यंत योग्य पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फॉरेन्सिक मेडिसिन विभाग, पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅब, एव्हिएशन अथॉरिटीज तसेच इतर केंद्रातील विविध संस्था तपासात सहकार्य करत आहेत.
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) सोबत सीआयडीचा सातत्याने समन्वय सुरू असून, त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अहवाल प्राप्त करून तो एडीआर (अकस्मित मृत्यू नोंद) तपासात विचारात घेतला जाणार आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहितीही त्यांनी दिली. तपासादरम्यान घातपात, गुन्हेगारी कट, रॅश किंवा निग्लिजन्स, इलीगल ओमिशन यांसारखी कोणतीही बाब निष्पन्न झाल्यास संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास पूर्ण केला जाईल आणि न्यायालयात अभियोग चालवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तपास योग्य दिशेने आणि योग्य वेगाने सुरू असल्याचा पुनरुच्चार करत रामानंद म्हणाले की, विविध केंद्रीय संस्था आणि तज्ज्ञांचे मत (एक्सपर्ट ओपिनियन) घेतले जात आहे. AAIB चा अहवालही तपासात महत्त्वाचा घटक असेल.
एसपी, सीआयडी पुणे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी (आयओ) असून, एसपी सीआयडी नवी मुंबई आणि इतर सहाय्यक पथकांना तपासासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. काही दिवसांपूर्वी डीजीसीएकडून व्हीएसआर कंपनीवर कारवाई करण्यात आली. मात्र, AAIB आणि सीआयडीच्या तपासाचा व्याप्ती वेगवेगळा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. AAIB चा अहवाल तयार झाल्यानंतर तो सीआयडीच्या तपासात समाविष्ट करण्यात येईल आणि त्यानुसार पुढील निष्कर्ष काढले जातील.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपासाला ठराविक टाइमलाइन नसते, विशेषतः अशा बहुआयामी तपासात अनेक संस्था सहभागी असतात. विविध ठिकाणांहून तज्ज्ञांचे मत, तांत्रिक अहवाल आणि डेटा संकलन करण्यास वेळ लागतो. मात्र तपास योग्य गतीने आणि योग्य दिशेने सुरू असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तपासात मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा करण्यात आले असून, उर्वरित पुरावे आणि आवश्यक तांत्रिक अहवाल लवकरच प्राप्त करण्यात येतील. निष्कर्ष समोर आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल, असे त्यांनी सांगितले. आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश सीआयडीच्या तपासाची व्याप्ती आणि प्रगती स्पष्ट करणे हा होता. तपासाबाबत कोणत्याही शंका असल्यास त्या दूर करण्यासाठी ही माहिती देण्यात आल्याचे रामानंद यांनी शेवटी स्पष्ट केले.



























































