
सामना प्रतिनिधी । पणजी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सभापतींकडे ध्वजारोहणाची जबाबदारी सोपवल्या बद्दल काँग्रेसने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत राज्यपापालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली. सभापती ध्वजारोहण करू शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना ध्वजारोहणाची जबाबदारी देणे चुकीचे आहे. या प्रश्नी राज्यपालांनी हस्तक्षेप करून स्वत: ध्वजारोहण करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे किंवा अन्य मंत्र्याला ही जबाबदारी देणे आवश्यक होते. सभापती हे मंत्रिमंडळात नसल्याने स्वातंत्र्यदिनी ते ध्वजारोहण करू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यावरून संशय व्यक्त होत आहे, असा आरोप आमोणकर यांनी केला.
मुख्यमंत्री उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत. परंतु त्यांच्या अनुपस्थित राज्याचा कारभार कोणी चालवायचा ही जबाबदारी दिली गेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळातील मंत्र्यावर विश्वास नाही, हे स्पष्ट होते, असेही आमोणकर यांनी यावेळी सांगितले.
प्रतापसिंग राणे यांनी माफी मागावी : कुतिन्हो यांची मागणी
काँग्रेसचे आमदार व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी परदेशात काम करणार्या गोमंतकीयांबाबत केलेले वक्तव्य त्रासदायक आहे. त्यांच्याकडून असे वक्तव्य अपेक्षित नव्हते. राणे यांनी आपली चूक कबूल करून गोमंतकीयांची माफी मागावी, अशी मागणी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. राज्यात काँग्रेसचे सरकार असताना रोजगार निर्मिती करण्यात आम्ही कमी पडल्यामुळे गोमंतकीय परदेशात नोकरीसाठी गेले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी अशी वक्तव्ये करणे चुकीचे आहे, असेही कुतिन्हो यांनी यावेळी सांगितले.




























































