
रुपेरी पडद्यावरची प्रेमळ आई म्हणून ओळखल्या जाणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांनी अलीकडेच जगाचा निरोप घेतला. सुलोचनादीदी यांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुलोचनादीदींच्या चित्रपटांतील गाणी व त्यांच्या आठवणींचा पट यानिमित्ताने रसिकांसमोर उलगडत गेला. ‘सुलोचना’ या नावाचे गारुड मराठी मनावर किती विलक्षण आहे याची जणू प्रचीती यानिमित्ताने आली.
स्वप्नील पंडित निर्मित मेघ मल्हार व स्वरसा इव्हेंट्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ‘दैव जाणिले कुणी’, ‘देव जरी मज कधी भेटला’, ‘कबिराचे विणतो शेले काwसल्येचा राम’, ‘गाडीवान दादा’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अशी अनेक गाणी प्रीती निमकर जोशी, विद्या करलगीकर, सानिया पंडित, दत्ता मेस्त्राr या कलाकारांनी समरसून सादर केली. सर्वच वादकांची त्यांना अतिशय उत्तम साथ दिली. प्रशांत लळीत यांनी संगीत संयोजन तर स्मिता गवाणकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. ‘अखेरचा हा तुला दंडवत…’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. सुलोचनादीदी यांच्या कन्या कांचन घाणेकर, नातजावई पराग आजगावकर यांनी सांगितलेल्या दीदींच्या हृद्य आठवणी कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू होत्या. या कार्यक्रमाला जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे विजय, श्रीराम व दिलीप हे देखील हजर होते.



























































