रेमो डिसूजाचा निर्मात्याला पाच कोटींचा गंडा, गाजियाबाद पोलिसांकडे पासपोर्ट जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्मात्याला पाच कोटी रुपयांना गंडा घालणार्‍या कोरियोग्राफर रेमो डिसूजा याने  गाजियाबाद पोलिसांकडे आपला पासपोर्ट जमा केला आहे. प्रयागराज हायकोर्टाने रेमोचा जामीन अर्ज मंजूर करतानाच त्याला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रेमोने रात्री साडेदहाच्या सुमारास पोलीस ठाणे गाठत आपला पासपोर्ट जमा केला.

अभिनेत्री जरीन खान हिची मुख्य भूमिका असलेला ‘अमर मस्ट डाय’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी रेमोने सत्येंद्र त्यागी यांच्याकडून 2013 साली 5 कोटी रुपये उसने घेतले हेते. तसेच एका वर्षाच्या आत हे पैसे परत करण्याचे आश्वासन निर्माते त्यागी यांना दिले होते. दिलेल्या मुदतीत रेमोने पैसे परत न केल्यामुळे त्यागी यांनी 2016 साली सिहानी गेट पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार रेमोविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तीन वर्षांपूर्वी त्यागी यांनी न्यायालयातही याप्रकरणी याचिका दाखल केली. आपल्याला जामीन मिळावा यासाठी रेमोने प्रयागराज हायकोर्टात अर्ज केला. हायकोर्टाने त्याचा जामीन अर्ज मंजूर करतानाच देश सोडून न जाण्याची अट घातली आहे.

पासपोर्ट जमा  करण्यास नकार

रेमोने परदेशात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी पोलीस ठाण्यात पासपोर्ट जमा करण्यास नकारही दिला होता. परंतु तपास अधिकारी अशोक उपाध्याय यांनी त्याला विरोध करत रेमोला परदेशात जाण्यास बंदी घातली, तर अधीक्षक सुधीर कुमार सिंह यांनी रेमोला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले.