आरक्षणातील 50 टक्क्यांची अट काढून टाका; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, जातीनिहाय जनगणनेसाठी दिला सल्ला

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रव्यापी जातीनिहाय गणनेबाबत तीन सूचना केल्या, ज्यामध्ये पुढील राष्ट्रीय जनगणनेचा समावेश आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रातील काही अंश त्यांनी X वर शेअर केला आहे. यामध्ये खरगे यांनी पुढील सूचना दिल्या आहेत. ‘तेलंगणा मॉडेल’ वर आधारित एक प्रश्नावली, जातीनिहाय सर्वेक्षण निकालांकडे दुर्लक्ष करून ‘जबरदस्तीने लादलेली’ 50 टक्के आरक्षण मर्यादा काढून टाकण्यासाठी एक घटनात्मक दुरुस्ती आणि खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी कलम 15(5) ची ‘तात्काळ अंमलबजावणी’ यांचा समावेश आहे.

काँग्रेसशासित तेलंगणाने जातनिहाय सर्वेक्षण केले आणि त्याचे निकाल फेब्रुवारीमध्ये जाहीर केले. सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा केल्यापासून, संपूर्ण देशात ‘तेलंगणा मॉडेल’ स्वीकारण्याची मागणी काँग्रेस करत आहे.

दरम्यान, खरगे यांनी पंतप्रधानांना जात जनगणनेच्या मुद्द्यावर लवकरच सर्व राजकीय पक्षांशी संवाद साधण्याचे आवाहनही केले.

खरगे यांनी पुढे अधोरेखित केले की जातीनिहाय जनगणना ‘विभाजनकारी’ मानली जाऊ नये कारण ती ‘मागास, वंचित आणि उपेक्षित लोकांना अधिकार देण्याचे साधन म्हणून काम करते’.

‘आपला देश महान आहे आणि आपले लोक मोठ्या मनाचे असून नेहमीच प्रतिकूल परिस्थितीत एकत्र उभे राहिले आहेत. अलिकडेच, पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आपण सर्वांनी मजबूत एकता दाखवली’, असे खरगे यांनी पत्रात म्हटले आहे.

जातीनिहाय जनगणना काँग्रेसने सुचवलेल्या ‘व्यापक पद्धतीने’ केली पाहिजे कारण यामुळे ‘सामाजिक आणि आर्थिक न्याय आणि दर्जा आणि संधीची समानता’ सुनिश्चित होईल, असे त्यात म्हटले आहे.