
सामना प्रतिनिधी । राणी सावरगाव
डोंगराळ भागात वसलेल्या राणीसावरगाव येथील रेणुका देवीचे मंदिर देवींच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाते. त्यामुळे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
राणीसावरगाव येथे सुमारे ७०० वर्षापूर्वी बांधलेले देवीचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. विश्वस्त म्हणून गळाकाटू कुटूंबातील वंशज काम पाहतात. यावर्षी १० ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गावातील प्रत्येक घरात घटस्थापना करून नऊ दिवस उपवास केले जातात. माहूर व तुळजापूरच्या देवीचे ठाण म्हणून येथील रेणुका देवीची भक्तीभावे आराधना केली जाते. माहूर, तुळजापूरला जाणारे भाविक आवर्जून राणीसावरगाव येथे येऊन दर्शन घेतात. नवसाला पावणारी देवी अशी या देवीची अख्यायिका आहे.
नवरात्र उत्सव काळात लातूर, नांदेड, परभणी आणि शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून भाविक राणीसावरगाव येथे दाखल होतात. भाविकांची संख्या लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला आहे. श्री चुडामुनी महाराजांची पालखी अहमदपूर येथून राणीसावरगाव येथे येते. या पालखी सोहळ्यात ३ ते ४ हजार भाविकांचा सहभाग असतो. राणीसावरगाव येथे यावर्षी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दररोज रात्री आरती होते. श्रींच्या नावाने प्रसाद वाटप केला जातो. आष्टमीला होमहवन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनात पालखी मिरवणूक काढली जाते. सर्व गावकरी पालखी सोबत माळावरील मूळपीठ असलेल्या देवी मंदिरात जमतात. या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम होतो. दरम्यान, नवरात्रोत्सव काळात भाविकांची संख्या दररोज वाढत आहे. गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोऱ्या होण्याची शक्यता असते. तेव्हा पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत असून, या ठिकाणीही पोलीस प्रशासन नजर ठेवून आहे.






























































