मच्छिमारांना दिशादर्शक ‘हिरवी बत्ती’ तत्काळ सुरू करा – बाबी जोगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

समुद्रात मासेमारीस गेलेल्या नौकांना सायंकाळी उशिरा बंदरात परतण्यासाठी दिशा दाखविणाऱ्या दोन बत्तीपैकी हिरवी बत्ती बंद आहे. खडकाळ किनारपट्टी भागातून किनाऱ्यावर येताना मच्छीमाराना अडचणी येत होत्या. मच्छिमारांच्या समस्या लक्षात घेता आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार शिवसेना शहरप्रमुख व मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी बंदर अधिकाऱ्यांसह किनारपट्टीची पाहणी केली. यावेळी बंद हिरवी बत्ती तत्काळ सुरू करावी तसेच बत्तीच्या टॉवरची उंची वाढविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या.

मालवण बंदरात येणाऱ्या नौकांना दिशा दाखविणारी हिरवी बत्ती बंद असल्याने गैरसोय होत होती. याप्रकरणी मच्छीमारांनी आमदार नाईक यांचे लक्ष वेधले असता त्यांनी पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी सकाळी दोन्ही बत्तीची पाहणी करण्यात आली. हिरव्या बत्तीच्या परिसरातील झाडी हटविण्याच्या तसेच बत्तीच्या टॉवरची उंची वाढविणे आवश्यक असल्याने त्याचा प्रस्ताव सादर करण्याचा सूचना बंदर विभागास करण्यात आल्या.

यावेळी बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, मेघनाद धुरी, दिलीप घारे, बंदर विभागाचे साहेबराव कदम, धनाजी चोडणेकर आदी उपस्थित होते.