ब्राझीलचे वादग्रस्त राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, महिलांवर केली होती अश्लाघ्य शेरेबाजी

1163

हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक दिनाला ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे तेच बोल्सनारो आहेत ज्यांनी महिलांबाबत अश्लाघ्य शेरेबाजी केली होती.  ब्राझीलच्या विरोधी पक्षाच्या त्यावेळच्या सदस्या मारिया रोझारिओला” मी तुझ्यावर बलात्कार करावा, इतकी काही तुझी लायकी नाही ! ” असे विधान संसदेत केले होते.

बोल्सनारो यांनी केलेल्या विधानावरून बराच वादंग झाला होता आणि बोल्सनारो यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात होती. बोल्सनारो यांनी माफी मागण्यास नकार तर दिलाच शिवाय त्यांनी आपल्या विधानाचे समर्थनही केले. ‘ती कुरुप दिसते म्हणून मी तिच्यावर बलात्कार करणार नाही’ असे नवे विधान त्यांनी पूर्वीच्या विधानाला जोडले होते.

बोल्सनारो यांनी आणखी एक विधान केले होते ज्यामुळे पुन्हा एकदा  त्यांच्यावर जबरदस्त टीका झाली होती. मला पाच मुलं आहेत, त्यातील 4 मुलगे आहेत पाचव्या वेळी मी कमजोर पडलो होतो म्हणून मुलगी झाली. बोल्सोनारोंनी वेळोवेळी अनेक बलात्काऱ्यांचं समर्थनही केलेलं आहे. महिलांविषयी अनेकदा केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बोल्सोनारो सतत चर्चेत असतात. समलिंगींबाबत बोलताना बोल्सनारो म्हणाले होते की जर मला दोन पुरुष रस्त्यात एकमेकांचे चुंबन घेताना दिसले तर त्यांना मी चोपून काढेन. त्यांनी निर्वासितांना जगातील सगळ्यात मोठी घाण असंही संबोधलं होतं.

ब्राझीलमध्ये ब्रिक्स परिषद झाली होती. या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी बोल्सनारो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. गेल्या वर्षी  प्रजासत्ताक दिनाला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. बोल्सनारो हे तिथल्या पुराणमतवादी पक्षाचे नेते आहेत. कट्टर उजव्या विचारसरणीचे असलेले बोल्सनारो हे ब्राझीलचे 38 वे राष्ट्रपती आहेत. समलिंगी संबंधांचे कट्टर विरोधक, लिंग आणि वर्णभेदी अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्या याच प्रतिमेमुळे प्रजासत्ताक दिनाला त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यावर देशातील काही सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या