>> मेघना साने ([email protected])
मराठीतच नव्हे, तर इतर भाषांतही स्त्रियांनी विपुल साहित्य लिहिलेलं आहे; मात्र त्याची नोंद वाङ्मयाच्या इतिहासात दिसत नाही. या विचाराने प्रेरित होऊन साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या उच्चशिक्षित आणि संशोधनाची आवड असणाऱया समविचाराच्या महिलांनी एकत्र येत ‘विमेन्स लिटरेचर इन इंडियन लँग्वेजेस’ या प्रकल्पाची निर्मिती केली. हा प्रकल्प तर राष्ट्रीय पातळीवर गाजला.
संशोधक वृत्तीच्या माणसाला साहित्याचा अभ्यास करताना एखादा प्रश्न जर सतत सतावू लागला तर त्याचं मन अस्वस्थ बनतं. त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरिता तो आपला वेळ आणि शारीरिक ताकद खर्चून मोठय़ा प्रमाणात माहितीचं संकलन करतो, विश्लेषण करतो आणि सत्यशोधन करण्याच्या मार्गी लागतो.
डॉ. मंदा खांडगे यांना ‘स्त्रियांचे साहित्य’ हा विषय घेऊन पीएच.डी. करताना एक प्रश्न अस्वस्थ करीत होता – ‘मराठी वाङ्मयाच्या इतिहासात स्त्रियांना गौण स्थान का?’
मराठीतच नव्हे, तर इतर भाषांतही स्त्रियांनी विपुल साहित्य लिहिलेलं आहे; मात्र त्याची नोंद वाङ्मयाच्या इतिहासात दिसत नाही. मग हे काम कोणीतरी केलं पाहिजे. मग आपणच का करू नये या विचाराने साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या उच्चशिक्षित आणि संशोधनाची आवड असणाऱया समविचाराच्या महिलांनी एकत्र येत अनेक मोठय़ा प्रकल्पांची निर्मिती केली. ‘विमेन्स लिटरेचर इन इंडियन लँग्वेजेस’ हा त्यांचा प्रकल्प तर राष्ट्रीय पातळीवर गाजला. त्याची ही कहाणी.
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची स्थापनाच मुळात स्त्रियांच्या साहित्यावर चर्चा करण्यासाठी झाली होती. 1960-65 साली प्रसिद्ध लेखिका संजीवनी मराठे, पद्मा गोळे, शांताबाई किर्लोस्कर आणि सरिता पत्की यांनी मिळून एक छोटासा गट स्थापन केला. त्या चौघी एकत्र येऊन स्त्राrसाहित्यावर चर्चा करू लागल्या. पुढे साहित्यात रस असणाऱया आणखी काही महिलाही सामील झाल्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख रा. शं. वाळिंबे यांना स्त्रियांचा हा उपाम माहीत झाला. त्यांनी या स्त्रियांसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृह मीटिंगसाठी देऊ केले.
साहित्यावर चर्चा करण्यासाठी मग स्त्रिया त्या ऑफिसमध्ये जमू लागल्या आणि त्यांनी रीतसर मंडळ स्थापन केलं. त्याचे नाव ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ.’ हळूहळू पुण्यातील सर्व प्रसिद्ध लेखिका या मंडळाच्या सभासद झाल्या. विद्या बाळ, सरोजिनी वैद्य, शकुंतला गोगटे, जोत्स्ना देवधर, अनुराधा पोतदार या सगळय़ाच या उपामात सामील झाल्या. कधी चर्चा तर कधी कार्पाम व्हायचे. 1985 साली डॉ. मंदा खांडगे या मंडळाच्या सभासद झाल्या. भगिनींनी एकत्र येऊन काही संशोधन करावं अशी कल्पना त्यांनी मांडली आणि एक संशोधन विभाग स्थापन केला. संशोधन विभागाची प्रमुख म्हणून जबाबदारीदेखील स्वीकारली. या संशोधन विभागातर्फे ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ घेण्याचा प्रयत्न करावा अशी कल्पना त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये बोलून दाखवली. मंदाताई सातत्याने त्यावर विचार करत होत्या. एकदा डॉ. सरोजिनी वैद्य काही कार्पामासाठी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी डॉ. मंदा खांडगे आपल्या कार्यकारिणीला घेऊन त्यांना भेटल्या आणि स्त्रीसाहित्याचा मागोवा घेण्याची इच्छा बोलून दाखवली. डॉ. सरोजिनी वैद्य त्यावेळी राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक होत्या. ही प्रकल्पाची कल्पना खूपच आवडली. सरोजिनीबाईंनी पाठिंबा दिल्यानंतर मंडळाच्या सभासदांमधे उत्साह निर्माण झाला आणि त्यादेखील या प्रकल्पासाठी काम करायला तयार झाल्या. साहित्यप्रेमी भगिनी मंडळात एम.ए. आणि पीएच.डी. झालेल्या काही स्त्रिया होत्या. त्यांनी तयारी दर्शविली आणि 1997 साली ‘स्त्रीसाहित्याचा मागोवा’ घेण्याचं काम सुरू झालं. याअंतर्गत मराठी साहित्यातील स्त्रीसाहित्यिकांच्या नोंदी आणि त्यांची माहिती गोळा करणं हे काम अनेक अभ्यासक करू लागले. या प्रकल्पासाठी डॉ. सरोजिनी वैद्य यांनी कालखंड निश्चित करण्याचं सुचवलं होतं. त्याप्रमाणे 1850 ते 1950, 1950 ते 2000 आणि 1850 ते 2000 अशा तीन कालखंडांतील स्त्री साहित्यिकांच्या नोंदी आणि त्यांची माहिती गोळा करण्याचं ठरलं. अर्थात हे काम फक्त मराठी भाषेत होणार होतं. या प्रकल्पाचं काम चार-पाच वर्षं तरी सुरू राहणार होतं. दरम्यान 2002 मध्ये डॉ. सरोजिनी वैद्य निवृत्त झाल्या आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या नव्या कार्यकारिणीने सर्व प्रकल्प पुन्हा तपासले जातील असं घोषित केलं. शिवाय प्रत्येक प्रकल्पाची परवानगी मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार होती. त्यामुळे डॉ. मंदा खांडगे आणि त्यांच्या टीमने राज्य मराठी विकास संस्थेकडून हा प्रकल्प काढून घेतला. त्याकामी डॉ. वसुंधरा पेंडसे-नाईक अध्यक्ष होत्या. त्यांनी मदत केली.
1997 साली सुरू झालेल्या या प्रकल्पाचं काम 2002 मध्ये पूर्ण झालं. या प्रकल्पासाठी डॉ. मंदा खांडगे यांच्याबरोबर डॉ. लीला दीक्षित, डॉ. अरुणा विनया खडपेकर याही संपादक मंडळात होत्या. राज्य मराठी विकास संस्थेकडून प्रकल्प काढून घेतल्यामुळे आता हा प्रकाशित कोणी करायचा हा प्रश्न होता. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या डॉ. कल्याणी दिवेकर या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह व भारती विद्यापीठात प्राध्यापक होत्या. संपादक मंडळ डॉ. कल्याणी दिवेकर यांच्याबरोबर कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांना जाऊन भेटले. कुलगुरूंनी प्रकल्पाची सर्व माहिती ऐकून घेतली व मदत करण्याची तयारी दर्शवली. ग्रंथाचं प्रकाशन मात्र भारती विद्यापीठ व साहित्यप्रेमी भगिनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्हावं अशी कल्पना त्यांनी मांडली. त्या प्रकाशन समारंभाला डॉ. सुमा चिटणीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
संशोधक महिलांनी, ‘स्त्री साहित्याचा मागोवा – 1850 ते 2000’ या तिसऱया खंडासाठी त्या काळात विविध साहित्यप्रकार लिहिणाऱया एकूण 16000 लेखिकांची नोंद केली होती आणि अकराशे ते बाराशे स्त्रियांची माहितीही संकलित झाली होती. ही नुसती नोंद व माहिती नव्हती, तर प्रकल्पाच्या अभ्यासकांनी या कालखंडातील स्त्राrसाहित्यिकांच्या साहित्याची केलेली समीक्षासुद्धा या प्रकल्पात समाविष्ट आहे. या प्रकल्पासाठी स्त्री साहित्याचे कथा, कविता, ललित इत्यादी सोळा साहित्यप्रकार अभ्यासले गेले. त्यासाठी 36 अभ्यासकांनी काम केले. एक प्रकारे हा 1850पासूनच्या स्त्रीसाहित्याचा
इतिहासच आहे.
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचं संशोधन मंडळ पुन्हा प्रकल्पाकडे वळलं. आता संशोधक विभागप्रमुख डॉ. मंदा खांडगे यांनी ‘भारतीय भाषांतील स्त्रियांचे साहित्यातील योगदान’ असा मोठा प्रकल्प निश्चित केला होता. त्यासाठी बैठका वगैरे झाल्या. सर्वांची संमती मिळाली.
संविधानाने एकूण 22 भाषांना मान्यता दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प दोन खंडांत करावा असं ठरलं. एका खंडात दहा भाषा व दुसऱया खंडात दहा भाषा. याकरिता संपूर्ण हिंदुस्थानातून पंजाब, गुजरात, आसाम, मध्य प्रदेश, केरळ अशा विविध प्रांतांतील अभ्यासक शोधावे लागले. काही विद्यापीठांना संपर्क करून ते मिळवावे लागले. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे डीन डॉ. निशिकांत मिरजकर यांना ‘अभ्यासक मिळवून देण्यास मदत करा’ म्हणून विनंती केली. त्यांनी जबाबदारी घेतली. पुढे या प्रकल्पाचे संपादक म्हणूनदेखील सामील झाले. ‘भारतीय भाषेतील स्त्राrसाहित्याचा मागोवा’ याचे दोन खंडांचे काम पूर्ण झाले. याचे संपादक होते डॉ. मंदा खांडगे, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. विद्या देवधर आणि डॉ. निशिकांत मिरजकर. हा ग्रंथ प्रकाशित करण्यास सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन लँग्वेजेस यांनी आर्थिक सहकार्य दिलं. या प्रकल्पाची नोंद राष्ट्रीय पातळीवर झाली. (क्रमश)