
सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका व पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक इच्छुक गारद झाले आहेत. आष्टा, जत नगरपालिका तसेच शिराळा व कवठेमहांकाळ नगरपंचायती खुल्या गटासाठी राखीव, तर तासगाव, पलूस नगरपालिका सर्वसाधारण महिला, तर ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, विटा नगरपालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
ओबीसी आरक्षण व प्रभागरचना यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील 247 नगरपालिका व 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत मुंबई मंत्रालयात पार पडली. यामध्ये सांगली जिह्यातील सहा नगरपालिका व पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. सध्या कवठे महांकाळ नगरपंचायत वगळता इतर सहा नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहेत. त्यासाठी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत पार पडली.
सांगली जिल्ह्यातील आष्टा व जत नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुले झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी चुरस निर्माण होणार आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रमुख लढत होणार आहे. आष्टा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुले असल्याने मोठी चुरस आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रामुख्याने लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून वैभव शिंदे, झुंझारराव पाटील, विशाल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवीण माने इच्छूक आहेत.
जत नगरपालिकेसाठी सर्वसाधारण नगराध्यक्षपद आहे. यापूर्वी दोन निवडणुकींसाठी इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण होते. या निवडणुकीसाठी सर्वसाधारण झाल्याने इच्छुकांची रांग लागली आहे. या ठिकाणी भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडी होण्याची शक्यता दाट आहे.
तासगावमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे दिग्गज नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या गटात प्रामुख्याने लढत होणार आहे. विटा नगरपालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण आहे. पलूस नगरपालिकेसाठी देखील सर्वसाधारण महिला आरक्षण आहे.
ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी होणार का, याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून डॉ. संग्राम पाटील, आनंदराव मलगुंडे तर शिवसेनेकडून तालुकाप्रमुख सागर मलगुंडे इच्छूक आहेत. शिराळा व कवठे महांकाळ नगरपंचातीसाठी खुले झाले आहे. कडेगाव सर्वसाधारण महिला, तर आटपाडी व खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षण पडले आहे.
नगरपालिका व त्यांचे आरक्षण ः
आष्टा – सर्वसाधारण, जत – सर्वसाधारण, पलूस – सर्वसाधारण महिला, तासगाव – सर्वसाधारण महिला, ईश्वरपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, विटा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नगरपंचायत व त्यांचे आरक्षण ः
शिराळा – सर्वसाधारण, कवठे महांकाळ- सर्वसाधारण, कडेगाव – सर्वसाधारण (महिला), खानापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, आटपाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग