
वित्तीय प्रपत्र जाहीर करण्यासंदर्भात नियमांची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एअरटेल पेमेंट्स बँकेला 31.80 लाखांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसनुसार एअरटेल पेमेंट्स बँकेने दिलेल्या खुलाशामध्ये काही त्रुटी आढळून आल्याने हा बडगा उगारण्यात आला आहे. आरबीआयच्या 30 मार्चच्या प्रसिद्धीपत्रकानुसार बँकेने एयरटेल पेमेंटसह कर्नाटकमधील ‘दि दावनगिरी जिल्हा मध्यवर्ती बँक व उत्तर प्रदेशातील नगर सहकारी बँक, इटावा यांच्यावरदेखील कारवाई केल्याचे जाहीर केले आहे.
आरबीआयकडून संस्थांची वेळोवेळी तपासणी केली जाते. यात आरबीआयला एयरटेल पेमेंट, दि दावनगिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, कर्नाटक व नगर सहकारी बँक, इटावा, उत्तर प्रदेश या बँकांच्या नियमांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार आरबीआयने संबंधित संस्था आणि बँकेला बँकिंग कायद्यानुसार कारणे दाखवा नोटीस बजावल्या. दरम्यान बँक आणि संस्थांकडून प्राप्त झालेल्या खुलास्यामध्ये समाधान कारक उत्तर न मिळाल्याने आरबीआयकडून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
काय त्रुटी आढळल्या?
वित्तीय प्रपत्र जाहीर करण्यासंदर्भातील नियमांची पूर्तता न केल्याने एअरटेल पेमेंटस बँकेला आरबीआयने 31.80 लाखांचा दंड ठोठावला आहे. कर्नाटकमधील दावनगिरी जिल्हा बँक केवायसी रेकॉर्ड अपडेट करणे आणि बँकिंग नियमन कायद्याचं पालन करण्यात अयशस्वी ठरल्याने दीड लाखाचा दंड आकाराला. तर उत्तर प्रदेशातील नगर सहकारी बँकेने संचालकांना कर्ज मंजूर करणे, कर्जदाराला कर्ज देताना मर्यादांचे उल्लंघन करणे तसेच केवायसी रेकॉर्ड अपलोड न केल्याचे उघड होताच तीन लाखांचा दंड आकारला आहे.





























































