
नायगाव येथील स्प्रिंग मिल चाळींचा पुनर्विकास अत्यंत संथगतीने सुरू असून अडीच वर्षांपासून काम प्लिंथ लेवलपर्यंतसुद्धा झालेले नाही. त्यामुळे चाळीतील 648 रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. याविषयी पुढील धोरण ठरवण्यासाठी उद्या, रविवारी सकाळी 11 वाजता भोईवाडा येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे रहिवाशांची सभा होणार आहे.
बॉम्बे डाईंग कंपनीच्या मालकीच्या टेक्स्टाईल मिल प्रभादेवी व स्प्रिंग मिल नायगाव, वडाळा येथे कार्यरत होत्या. 2006 नंतर दोन्ही मिल बंद झाल्या. बॉम्बे डाईंग मिलमध्ये कामगारांसाठी स्प्रिंग मिल नायगाव, गं. द. आंबेकर मार्ग या ठिकाणी आठ मोठय़ा चाळी आणि सहा बैठय़ा चाळी अशा 648 कामगारांचे संकुल आहे. या चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी कंपनीने प्रभादेवीची सर्व मालमत्ता विकून पुनर्विकास चालू केला, परंतु आजतागायत अडीच वर्षांपासून प्लिंथ लेवलपर्यंतसुद्धा काम आलेले नाही. परिणामी 198 रहिवासी भाडे घेऊन बाहेर आहेत आणि 450 रहिवासी जुन्या चाळीमध्ये आहेत. त्यामुळे या रहिवाशांमध्ये असंतोष वाढत चाललेला आहे.
चाळींच्या पुनर्विकासाला गती द्या
सनियंत्रण कमिटीच्या आदेशानुसार, तिन्ही कमिटीची बैठक कंपनीने बोलावली होती, परंतु कमिटी पदाधिकारी आणि कंपनी पदाधिकाऱ्यांमध्ये पुनर्विकासाबाबत समाधान न झाल्याने रहिवाशांमध्ये संभ्रम आहे. तेव्हा चाळींचा पुनर्विकास कंपनी मालकाने लवकरात लवकर करावा, अशी रहिवाशांची मागणी असल्याचे स्प्रिंग मिल चाळ भाडेकरू संघाचे सेक्रेटरी मनोहर जक्का यांनी सांगितले.