
लाखो वारकऱयांचे श्रद्धास्थान असणाऱया संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे संकट आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने 40 वारकऱयांसह आळंदी येथून एसटीने पादुका पंढरपूर येथे नेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच देहू आणि आळंदी येथील गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने देहू, आळंदीसह आसपासच्या गावांमध्ये सोमवारपासून (दि. 28) संचारबंदी लागू केली आहे. येत्या 4 जुलैपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे.
या काळात कोणालाही परिसरात फिरण्यास, एकत्र येण्यास परवानगी दिली जाणार नाही. परिसरातील सर्व प्रकारच्या खासगी, सार्वजनिक वाहतुकीस बंदी राहणार आहे. याबरोबरच संचारबंदी असलेल्या गावांमधील धर्मशाळा, मठ, भक्तनिवास, हॉटेल अशा ठिकाणी मंदिर संस्थान समिती व प्रशासनाकडून दिलेले पासधारक वारकरीवगळता कोणालाही वास्तव्य करता येणार नाही.
देहू येथून 1 जुलै रोजी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि आळंदी येथून 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. ‘श्रीं’च्या पादुका देहू व आळंदी येथे पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी 18 जुलैपर्यंत ठेवून 19 जुलै रोजी प्रत्येकी दोन बसने पंढरपूर येथे नेण्यास परवानगी दिली आहे.
इंद्रायणी नदीत स्नान करण्यास मज्जाव
वारकरी, भाविक इंद्रायणी नदीच्या पाण्यात स्नान करणे पवित्र मानतात. त्यामुळे येथे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन 28 जून ते 20 जुलै या कालावधीत देहूगाव व आळंदी परिसरातील इंद्रायणी नदी पात्र, घाट येथे सर्व भाविकांना प्रवेश निषिद्ध राहील. तसेच नदीपात्रात स्नान व हातपाय धुण्यास बंदी लागू राहील.


























































