राज्यात ‘ब्रेक द चेन’ च्या निर्बंधामध्ये वाढ; गुरुवारी रात्री 8 वाजेपासून होणार लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात फैलावणारा कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी सरकारने ‘ब्रेक द चेन’ च्या निर्बंधांमध्ये आणखी वाढ केली आहे. हे नवे निर्बंध गुरुवारी रात्री 8 वाजूपासून लागू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या निर्बंधांनुसार मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.

लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.