अज्ञात कारणातून सेवानिवृत्त शिक्षकाने कुटुंबासह जीवन संपवल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विजय पचोरी, बालाबाई पचोरी, गणेश पचोरी आणि दीपक पचोरी अशी चौघांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
चौघांपैकी तिघांचे हात पाठीमागे बांधलेले होते. यावरून तिघांची हत्या करून वडील विजय पचोरी यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. तपासाअंती कुटुंबाच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल.
गेल्या दिवसांपासून मुलाच्या व्यवसायातील आर्थिक तंगीमुळे कुटुंबात वाद सुरू होते. हा विकोपाला गेल्याने ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तिघांचे हात पाठीमागे बांधून लटकलेले आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस तपासानंतरच सत्य समोर येईल.