ग्रॅच्युइटीच्या थकीत रकमेवरील व्याज देण्याच्या मागणीसाठी बेस्ट उपक्रमातील निवृत्त कामगार बायका-मुलांसह धरणे धरणार आहेत. आर्थिक स्थितीचे कारण देत बेस्टचे व्यवस्थापन निवृत्त होणाऱ्या कामगारांना ग्रॅच्युइटी वेळेवर देण्याबाबत टाळाटाळ करीत आहे. न्यायालयाच्या दणक्यानंतर ग्रॅच्युइटी देण्यात आली तरी थकीत राहिलेल्या रकमेवरील व्याज दिले नाही. ग्रॅच्युइटी थकीत राहिल्यास 10 टक्के व्याज देण्याची कायद्यातच तरतूद आहे. त्यानुसार आपल्या थकीत रकमेवरील व्याज मिळावे, अशी निवृत्त कामगारांची मागणी आहे.
व्याज देण्याबाबत कामगार व औद्योगिक न्यायालयानेही कामगारांच्या बाजूने निर्णय दिले आहेत. तरीही व्यवस्थापन त्यावर अंमलबजावाणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे बेस्ट जागृत कामगार संघटनेचे नेते सुहास नलावडे यांनी सांगितले. एका बाजूला निधी नाही म्हणून व्यवस्थान ग्रॅच्युइटी व त्यावरील व्याज देत नाही, दुसरीकडे कामगार व औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन व्यवस्थापन वकिलांच्या फीवर करोडो रुपये उधळत आहे, असा आरोपही त्यांनी केला.