
सामना प्रतिनिधी । देवगड
गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात परतीच्या पावसाने वीजेच्या गडगडाटासह धुमाकुळ घातला आहे. सोमवारी सायंकाळी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. गडगडाटासह आवाज आणि अचानक पडलेल्या पावसामुळे तालुका वासियांची तारांबळ उडाली. सायंकाळच्या सत्रात पडलेल्या वादळी पावसाने तिर्लोट-मोहूळगाव, भाटवाडी येथिल कृष्णकांत कोयंडे यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मागील दोन दिवसापासून तालुक्यात गडगडाटासह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह तालुकावासियांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी झाडे घरावर पडत आहे तर विद्युत वाहिन्यावर झाडे पडून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. यामुळे तालुक्यातील नागरीक व शेतकरी हवालदिल झाला आहे. वीज वितरणाच्या वाडा सबस्टेशनवरून आजूबाजूच्या गावांना वीजपुरवठा केला जातो मात्र अचानक आलेल्या पावसामुळे या भागातील विजपुरवठा काही उशिरापर्यंत सुरू न झाल्यामुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून जोपर्यंत विदयुत पुरवठा सुरळीत होणार नाही व कार्यालयातून बाहेर जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला.
तसेच तालुक्यातील नागरिक व शेतकरी हवालदिल झाले आहे असे असतानाच सोमवारी झालेल्या वादळ लखलखाट यासह तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला चांगले झोडपले आहे असे असले तरीही पुढील काही दिवस तालुक्यात गडगडाटासह सोसाट्याचा वारा व पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.


































































