धनादेश न वटता परत; आरोपीस 1 कोटीचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश जगताप यांनी आरोपी प्रदिप भगवानदास नहार (रा. नगर) यांचे शिक्षेविरुध्द केलेले अपील फेटाळून खालच्या कोर्टाने केलेला एक कोटी रुपये दंड व दीड वर्षे शिक्षा व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा कायम केली.

नगर येथील नहार हाऊस ऑफ व्हिडीओकॉन या फर्मने नगर अर्बन को ऑप बँक या बँकेकडून रुपये 50 लाखांचे कर्ज सन 1999 मध्ये घेतले होते. सदर कर्जाच्या परतफेडीपोटी जामीनदार या नात्याने आरोपी प्रदिप भगवानदास नहार यांनी रक्कम रुपये 87 लाखांचा चेक दिलेला होता. मात्र सदर चेक न वटता परत आल्यामुळे सन 2005 मध्ये आरोपी विरुध्द अर्बन बँकेने फौजदारी केस दाखल केलेली होती.

या केसमध्ये गुणदोषावर चौकशी होवून आरोपीविरुध्द गुन्हा शाबीत झाल्यामुळे, आरोपीस एक कोटी रुपये दंड व दीड वर्षे शिक्षा व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा कोर्टाने सुनावली होती. या शिक्षेविरुध्द जिल्हा न्यायालयात प्रदिप नहार यांनी अपील दाखल केले होते. या अपीलामध्ये चौकशी होऊन आरोपीचा केसमध्ये घेतलेला बचाव योग्य नसल्याने कोर्टाने अपील फेटाळून लावले व खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा कायम केली.

या केसमध्ये व अपीलामध्ये बँकेच्यावतीने अँड. प्रदिप एम. भंडारी, यांनी काम पाहीले त्यांना अँड. रोहित भंडारी यांनी सहकार्य केले.