हाऊसफुल्ल – प्रभावहीन कप्तान

2334

>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

एखाद्या दिग्दर्शकाने सलग वेगळय़ा धाटणीचे सिनेमे दिले असतील, एखादा अभिनेता कमर्शिअल असूनही आता प्रयोग करण्याकडे वळत असेल आणि या दोघांना घेऊन येणारा सिनेमा काही तरी वेगळा आहे याचीही जाणीव ट्रेलर बघताना होत असेल तर आपल्याला काही तरी चांगलं, वेगळं पाहायला मिळणार अशी उत्सुकता वाटायला लागते. वेगळेपणाची ओढ ही चोखंदळ प्रेक्षकांमध्ये जास्त असल्यामुळे अशा सिनेमांची जबाबदारी अधिकच वाढते. पण हा प्रयत्न यशस्वी नाही झाला तर… नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लाल कप्तान’ या सिनेमाची काहीशी अशीच अवस्था झाली आहे. ‘मनोरमा’, ‘एन एच टेन’सारखे मोजके, पण जबरदस्त प्रभावी सिनेमे देणारा दिग्दर्शक ‘लाल कप्तान’ हा प्रचंड वेगळा लूक असणारा सिनेमा घेऊन येतो तेव्हा नक्कीच उत्सुकता शिगेला पोचते. त्यात नुकतंच ‘सॅक्रेड गेम्स’मधून स्वतःचा प्रभाव पडणारा सैफ अली खान नागा साधूच्या भूमिकेत दिसताच या उत्सुकतेला आणखीनच खतपाणी मिळतं. पण प्रत्यक्ष सिनेमा मात्र अपेक्षाभंगाचं दान पदरात घालतो हे प्रेक्षकांचं दुर्दैव!!

हा सिनेमा उलगडतो सतराव्या शतकामध्ये. हा काळ म्हणजे मुघल साम्राज्य आणि अनेक छोटय़ा छोटय़ा राजांचं साम्राज्य संपुष्टात येत होतं आणि ब्रिटिश साम्राज्याने हिंदुस्थानात आपले हात पाय पसरायला सुरुवात केली होती. त्या काळात एक नागा साधू सुडाचा बदला घेण्यासाठी एकाला शोधत भटकत असतो. हे सूडनाटय़ भव्यदिव्य स्वरूपात पडद्यावर पाहायला मिळतं.

एका काळाला दाखवणारं हे नाटय़ असल्याने ते पाहणारा एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग आहे. पण प्रेक्षक कुठचाही असला तरीही पडद्यावर घडणारं नाटय़ त्याला खिळवून ठेवणारं असलंच पाहिजे. हा सिनेमाचा मूलभूत नियम प्रत्येक प्रेक्षकांसाठी सामायिक आहे आणि इथेच सगळय़ात आधी हा सिनेमा अडखळतो. भव्य दिव्यता उभी केली असली तरीही अगदी ढिसाळ पटकथा, प्रभाव पडू न शकणारे संवाद, बेजबाबदारपणे फिरवलेली संकलनाची कात्री आणि विशेष प्रभाव पडू न शकणारं दिग्दर्शन यामुळे हा सिनेमा उचल घेतच नाही आणि उत्सुकता कधी कंटाळय़ात बदलते ते कळतच नाही. सैफ अली खान हा नागा साधूच्या भूमिकेत समोर येतो. वीस वर्षांपूर्वी एका धोकेबाजांमुळे एका बाप आणि मुलाला फाशी देण्यात आली होती. पण त्यातनं तो मुलगा वाचतो आणि त्या धोकेबाजाला शोधण्यासाठी निघतो… अशी ही गोष्ट असली तरी तो वाचलेला मुलगा कोण हे पहिल्याच फटक्यात समजतं. खरं तर अशा सिनेमांमध्ये कथा भक्कम असणं सगळय़ात महत्त्वाचं असतं. पण इथे काय घडणार हे इतकं सहज समोर येत जातं की त्यातली गंमतच प्रेक्षकाला घेता येत नाही. सिनेमा इतक्या ठिकाणी अचानक ब्रेक लागल्यासारखा अडकतो की, कपाळावर आठय़ा जमायला लागतात आणि सिनेमाची सगळय़ात दुबळी बाजू म्हणजे त्याची लांबी… हे सगळं किमान पाऊण तास कमी वेळात बांधलं असतं तरीही किमान सुसह्य झालं असतं. पण सिनेमा थांबता थांबत नाही आणि प्रेक्षकांच्या हाती उरतो तो फक्त आणि फक्त कंटाळा. सिनेमाच्या दृश्यांची गती इतकी धीमी आहे की, त्यादरम्यान आपण एक झोप काढली तरीही फरक पडत नाही. (अर्थात गजगजीमुळे झोप लागत नाही ही वेगळी गोष्ट.)

अर्थात दिग्दर्शन करताना हॉलीवूडच्या सिनेमांची थोडी बहुत आठवण येते. एकंदर दृश्य प्रभाव निर्माण करताना छायांकनाची साथही उत्तम मिळाली आहे आणि त्यासोबत ध्वनीचा वापरही उत्तम झाला आहे. पण हे सगळं थोडा वेळ अनुभव म्हणून बरं वाटतं. पण प्रभावी चित्रीकरण अख्खा सिनेमा पेलू शकत नाही.

सैफ अली खानचं काम मात्र उत्तम झालंय. त्याच्या सोबत इतर कलाकारांची साथदेखील बारी लाभली आहे. पण दुर्दैवाने अखंड सिनेमा या नात्याने प्रेक्षकाला फक्त निराशाच सहन करावी लागते आणि ‘लाल कप्तान’ प्रेक्षक मनावर अधिराज्य करत नाही हेच खरं.

  • सिनेमा      लाल कप्तान
  • दर्जा   **
  • निर्माता     सुनील लुल्ला, आनंद एल राय
  • दिग्दर्शक    नवदीप सिंग
  • लेखक दीपक वेंकटेश, नवदीप सिंग
  • संगीत समीरा कोप्पीकर
  • कलाकार    सैफ अली खान, मानव विज, झोया हुसेन, दीपक डोब्रियाल, सिमॉन सिंग, सौरभ सचदेव, सोनाक्षी सिन्हा.
आपली प्रतिक्रिया द्या