
नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात हिंदुस्थानच्या महिलांनी इतिहास रचला आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पहिल्यांदाच वर्ल्डकप उंचावला. या वर्ल्डकपमध्ये यष्टीरक्षक बॅटर रिचा घोष हिने फिनिशरची भूमिका निभावली. तळाला येऊन अखेरच्या षटकांमध्ये तिने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. अवघ्या 23 व्या वर्षी वर्ल्डकप जिंकलेल्या रिचावर कौतुकाचा वर्षाव होत असून आता तिची डीएसपी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने शुक्रवारी ‘बांगा भूषण’ पुरस्कार देऊन तिचा गौरवही केला. बंगाल क्रिकेट असोसिएशनने कोलकातातील ईडन गार्डन्स येथे रिचाच्या सन्मानासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. यावेळी रिचाची डीएसपी पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता टीम इंडियाला आणखी एक डीएसपी मिळाला असून मोहम्मत सिराज, दीप्ती शर्मा, जोगिंदर शर्मानंतर आणखी एक खेळाडू पोलिसांच्या वर्दीत दिसणार आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशनने रिचा घोष हिला गोल्डन बॅड आणि गोल्डन बॅट प्रदान करून तिचा सन्मान केला. तसेच तिला 34 लाख रुपयांचे रोख पारितोषिकही जाहीर केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रिचाला सोन्याची साखळी भेट दिली. यावेळी मंचावर टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, माजी महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी उपस्थित होती. रिचासोबत यावेळी तिच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला.
विश्वविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रत्येकी सवा दोन कोटींचे बक्षीस
दरम्यान, वर्ल्डकपमध्ये रिचा घोष हिने तळाला येऊन चौफेर फटकेबाजी केली. वर्ल्डकपच्या आठ लढतीत तिने 235 धावा केल्या. यात अंतिम लढतीतील 34 धावांचाही (24 चेंडूत) समावेश आहे. या खेळीत तिने तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले होते. यामुळे हिंदुस्थानला दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते.

























































