
ओला, उबेर आणि रॅपिडोवर कारवाई करण्यास चालढकल करणाऱ्या परिवहन विभागाविरोधात गुरुवारी अॅपआधारित कॅब, रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी बंद पुकारला. परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद पाळण्यात आला. या बंदमुळे प्रवासी सेवेवर मोठा परिणाम जाणवला. मुंबई विमानतळ परिसरात प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्या सरकारी नियम पायदळी तुडवून बेकायदा सेवा देत असल्याचा आरोप करीत भारतीय गिग कामगार मंचाने गुरुवारी बंद पुकारला होता. संबंधित अॅग्रीगेटर्सविरुद्ध अनेक एफआयआर दाखल केल्यानंतरही त्यांची खासगी दुचाकीवरून प्रवासी सेवा सुरू आहे. याला परिवहन विभागातील भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा दावा भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला. संघटनेतर्फे केलेल्या आवाहनानुसार पहाटेपासूनच 90 टक्क्यांहून जास्त कॅबचालकांनी उत्स्फूर्तपणे त्यांची वाहने बंद ठेवली. मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक या सर्व शहरांमध्ये चालकांनी बंद पाळला. मुंबई विमानतळावर नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. परिवहन विभागाने निश्चित केलेले दर ओला, उबेर, रॅपिडोच्या ऑप्लिकेशनवर दिसावे, बाईक टॅक्सी त्वरित बंद करावी व इतर मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता. मुंबई विमानतळावर दररोज 400 ते 500 गाडय़ांचे वेटिंग असते. चालकाचा सुरुवातीला सकाळी नंबर लागला तर संध्याकाळी किंवा रात्री उशिरा भाडे मिळते. त्या ठिकाणी बंदचा मोठा परिणाम दिसला. उबेर फ्लीट कंपनीच्या काही गाडय़ा सोडल्या तर कॅबचा तुटवडा होता.
आझाद मैदानात मागील तीन महिन्यांपासून अॅपआधारित कॅब, रिक्षा आणि टॅक्सीच्या चालकांचा लढा सुरू आहे. भारतीय गिग कामगार मंचच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनाकडे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आंदोलक अजून आक्रमक झाले आहेत. यापुढे हा लढा अजून तीव्र होत जाईल.
z डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच






























































