
मोटार वाहन विभाग आणि पोलिसांमार्फत ई-चलान प्रणालीद्वारे सुरू असलेल्या जाचक दंडवसुलीविरोधात राज्यभरातील वाहतूकदार आक्रमक झाले आहेत. सरकारने दंडवसुलीतून नियमबाह्य लूट सुरू केल्याच्या निषेधार्थ वाहतूकदार उद्यापासून संपावर जाणार आहेत. ऑटोरिक्षा, टॅक्सींबरोबरच ऐन परीक्षेच्या काळात शाळांच्या बस बंद राहणार आहेत. संप पुकारतानाच वाहतूकदार आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढणार आहेत. त्यानंतरही सरकार पातळीवर तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा वाहतूकदारांनी दिला आहे.
ई-चलान प्रणालीच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीने लूट सुरू असल्याची नाराजी वाहतूकदारांमध्ये आहे. ट्रक, टेम्पो, बस, टॅक्सी व ऑटोरिक्षा आदी वाहतूकदारांच्या विविध गंभीर व प्रलंबित प्रश्नांकडे महायुती सरकारने पूर्णपणे डोळेझाक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यव्यापी संप पुकारून सरकारला जागे करण्याचा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीने घेतला आहे. समितीने सरकारला ई-प्रणालीबाबत पुनर्विचार करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. त्या अवधीत तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरले. सोमवारी मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. त्यातही कोणतीही ठोस लेखी हमी देण्यात आली नाही. त्यापाठोपाठ बुधवारी सायंकाळपर्यंत बैठकांचा धडाका सुरू राहिला; परंतु त्या बैठकाही निष्फळ ठरल्याने वाहतूकदार राज्यव्यापी संपाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. प्रामुख्याने ई-चलान प्रणालीच्या मुद्दय़ावर वाहतूकदार संपावर जाणार आहेत. एकीकडे संप पुकारण्याबरोबर दुसरीकडे आझाद मैदानात भव्य मोर्चा काढून सरकारला ई-चलान प्रणालीचे जाचक धोरण मागे घेण्यास भाग पाडण्याची आक्रमक भूमिका वाहतूकदारांनी घेतली आहे. संपामध्ये ट्रक-टेम्पोसारख्या अवजड वाहनांबरोबर स्कूल बस, खासगी टुरिस्ट बस, मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी, ऑटोरिक्षादेखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईसह संपूर्ण राज्यभरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होणार आहे.
एक मिनिट हॉर्न वाजवा… सरकारला जागे करा!
संप पुकारण्याआधी वाहतूकदारांनी ‘एक मिनिट हॉर्न वाजवा… सरकारला जागे करा’ या अनोख्या आंदोलनातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील वाहतूकदारांनी आपल्या गाडीचा हॉर्न सतत एक मिनिटे वाजवून सरकारच्या ई-चलान प्रणालीचा निषेध केला. वाहतूकदारांच्या कृती समितीने या अनोख्या आंदोलनाचे आवाहन केले होते. तसेच सरकारच्या अनास्थेचा निषेध म्हणून वाहतूकदार आझाद मैदानातील आंदोलना वेळी आपली वाहने तेथे नेणार आहेत. आंदोलन केल्यानंतर आपली वाहने सरकारच्या ताब्यात सोपवण्याची भूमिका वाहतूकदारांनी घेतली आहे.
दक्षिण मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होणार
राज्यभरातील वाहतूकदारांनी उद्याच्या मोर्चासाठी आझाद मैदानाकडे कुच केली आहे. सर्व वाहने दक्षिण मुंबईत येणार असल्यामुळे महामार्ग तसेच प्रमुख रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर कोंडी होण्याची शक्यता आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या भीषण तुटवडय़ाची भीती
आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे पंटेनर सध्या बंदरात अडकून पडले आहेत. याचदरम्यान महाराष्ट्रातील वाहतूकदारांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन, संपाचे शस्त्र उपसले आहे. या संपाचा राज्यभरातील व्यापार केंद्रावर दूरगामी परिणाम होणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचा भीषण तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.



























































