पुण्यात दोन गटांत दंगल; ११ जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

शहरात सराईत गुन्हेगारांचे साजऱ्या होणाऱ्या जंगी वाढदिवसामुळे शहरातील शांतता धोक्यात आली आहे. दत्तवाडी येथे म्हात्रे पुलाजवळ सराईत गुन्हेगाराने वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दुसऱ्या गटातील सराईताने त्याच्याकडे रागाने पाहिले म्हणून अंदाधुंद गोळीबार करीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही गटांतील ३० ते ३५ जण एकमेकांवर तुटून पडून बांबू, दगडांनी एकमेकांवर हल्ला चढवल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. दत्तवाडी पोलिसांनी दोन्ही गटांतील ११ जणांना अटक केली असून, ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सूरज ऊर्फ सुरज्या भालचंद्र यशवद (वय ३०, रा. राजेंद्रनगर) हा गोळीबारात जखमी झाला आहे. मयूर सुनील भगरे (वय २१, रा. म्हात्रे पुलाजवळ, दत्तवाडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार रोहित उटाडा, विजय ननावरे, अक्षय मारणे ऊर्फ मट्टा यांच्यासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, तर वैभव रोकडे (वय २१) याच्या फिर्यादीनुसार १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगार असलेल्या रोहित उटाडा याचा वाढदिवस असल्याने त्याचे २५ ते ३० मित्र दत्तवाडीतील शंकर मंदिराजवळ मध्यरात्री बारा वाजता केक कापण्यासाठी जमले होते. यावेळी या टोळक्याकडून हुल्लडबाजी सुरू होती. त्याचवेळी सराईत गुन्हेगार सूरज यशवद, मयूर भगरे हे तेथे बोलत उभे होते. त्यावेळी रोहित उटाडा याने आमच्याकडे काय रागाने पाहता आहात, असे म्हणत या दोघांना शिवीगाळ सुरू केली. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर उटाडा आणि त्याच्या साथीदारांनी या दोघांना बेदम मारहाण केली. रोहित उटाडाने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलाने अंधाधुंद गोळीबार केला. यात एक गोळी यशवद याच्या मांडीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला, तर दोन गोळ्या चुकल्याने तो बचावला. यानंतर यशवद याच्या झेडएल ग्रुपमधील साथीदारांनी येथे येऊन राडा घालण्यास सुरुवात केली. दुचाकी अंगावर घातल्या. वैभव रोकडे याच्या घरावर हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. दत्तवाडीत म्हात्रे पुलाजवळील गल्लीत हा राडा सुरू असल्याने येथे प्रचंड दहशत निर्माण झाली. दत्तवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत धिंगाणा सुरू होता. या प्रकरणातील दोन्ही गटांतील ११ जणांना अटक केली आहे. इतरांचाही शोध सुरू आहे, असे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले.

रोहित उटाडा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर दत्तवाडी आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. ननावरे आणि मारणे याच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. यशवद याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. अनिल तुपेरे याच्यावर २ गुन्हे दाखल आहेत. लकी व जुबेर यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत.