पंत महागात पडतोय… दहा सामन्यांत केवळ 110 धावा

आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असा मान मिळवणारा ऋषभ पंत लखनौला प्रचंड महागात पडतोय. 27 कोटींची विक्रमी बोली लावून लखनौने पंतला आपल्या संघात घेतले आणि कर्णधारही केले, पण तोच झुंजार पंत लखनौला सर्वात महागात पडतोय. फलंदाजीसह नेतृत्वातही पंत कमी पडत असल्यामुळे त्यांचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतही मागे पडलाय. आता लखनौच्या चेहऱयावर हास्य आणायचे असेल तर पंतला आपल्या फलंदाजीची कमाल दाखवावीच लागेल, अन्यथा आगामी मोसमात त्याचे कर्णधारपदही धोक्यात येऊ शकते.

अपयशी खेळ्यांची आयपीएल

गेले वर्ष पंतसाठी भन्नाट ठरले होते. अपघातानंतर केलेल्या पुनरागमनाने अवघ्या जगाचे मन त्याने जिंकले होते. आयपीएल, टी-20 वर्ल्ड कप आणि बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे पंतला वर्षाच्या प्रारंभी झालेल्या आयपीएलच्या मेगालिलावात विक्रमी किंमत लाभली होती. पंत 27 कोटींच्या महाप्रचंड बोलीवर लखनौचा झाला होता. त्यामुळे सर्वात महागडय़ा पंतकडून सर्वांनाच घणाघाती फलंदाजीची अपेक्षा होती, पण पंतने गेल्या दहापैकी एकाच डावात 63 धावांची खेळी केली, पण ती खेळीही त्याच्या लौकिकास साजेशी नव्हती. 49 चेंडूंत 63 धावा केल्या होत्या आणि या सामन्यात ते चेन्नईविरुद्ध हरले होते. ही एक खेळी वगळता अन्य आठ डावांत त्याने 47 धावा (4, 0, 3, 21, 2, 2, 15, 0) केल्या आहेत. त्याचा हा खेळ पाहून मैदानात गेल्या वर्षीचा झुंजार पंत नव्हे तर एक खचलेला पंत खेळत असल्याचा भास होतोय. त्याच्या अपयशी कामगिरीमुळे सध्या लखनौचे हास्यही हवेत विरले आहे. पुढील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.

पंतला झालेय तर काय…

ऋषभ पंत समोर येताच त्याचा धडाकेबाज आणि झुंजार खेळ आठवतो, पण हा पंत नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून काहीसा मागे पडत चालला आहे. यष्टिरक्षणासह मधल्या फळीतील मुख्य फलंदाज असलेल्या पंतला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चक्क बाकावर बसवण्यात आले. संघातील त्याचे स्थान अभेद्य असतानाही केएल राहुलला यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळविण्याचा जुगार खेळला गेला. तो कितपत यशस्वी ठरला हे सर्वांनाच माहीत असावे. पण पंतला या स्पर्धेत एक सामनाही खेळायला मिळाला नाही. तेव्हापासूनच पंतची देहबोली काहीशी संथ झाली आहे. त्या स्पर्धेत त्याचा केलेला गेम आयपीएलमध्ये महागात पडतोय. तो असाच अपयशी ठरला तर या झुंजार खेळाडूला संघात स्थान मिळवण्यासाठी पुन्हा झुंज द्यावी लागेल.

पंतने गाजवले 2024 साल

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या भीषण कार अपघातानंतर ऋषभ पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसेल की नाही, याबाबत सर्वांच्याच मनाच साशंकता होती. तब्बल सवा वर्ष पंतला मैदानाबाहेर बसावे लागले. पुनरागमनासाठी त्याला जबरदस्त मेहनत घ्यावी लागली होती. गेल्या वर्षी तो आयपीएलमध्ये पुन्हा आला, खेळला आणि त्याने सर्वांची मने जिंकली. त्याचा खेळ पाहून सारेच भारावले होते. राखेतून फिनिक्स जशी झेप घेतो तशी झेप त्याने घेतली होती. 41 च्या सरासरीने 446 धावा त्याच्या बॅटीतून निघाल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर तो टी-20 वर्ल्ड कपमध्येही निवडला गेला आणि त्याने जगज्जेत्या संघाला साजेशी कामगिरीही केली. हिंदुस्थानला जगज्जेतेपद मिळवून देणाऱया टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्या बॅटीतून 171 धावा निघाल्या होत्या. त्याच्यापेक्षा अधिक धावा रोहित शर्मा (257) आणि सूर्यकुमार यादवने (199) केल्या होत्या. या धमाकेदार कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेतही पंतच्या झुंजार खेळाने साऱयांना चक्रावून सोडले होते. खऱया अर्थाने पंतचे पुनरागमन अफलातून झाले होते आणि त्याने 2024 साल गाजवले होते.