#INDvWI पंतने धोनीचा विक्रम मोडला, गिलख्रिस्टशी बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीज दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने महेंद्रसिंह धोनी याचा विक्रम मोडला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पंतने यष्टीमागे दमदार कामगिरी नोंदवली. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 50 शिकार करण्याचा धोनीचा विक्रम मोडला आहे. यष्टीमागे ब्रेथवेटचा झेल घेत पंतना हा विक्रम केला.

21 वर्षीय पंतने 11 व्या कसोटीमध्ये यष्टीमागे 50 बळी मिळवले. तर धोनीने हिच कामगिरी 15 कसोटीत नोंदवली होती. पंतने ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक गिलख्रिस्टच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दोघांनीही 11 व्या कसोटीत ही कामगिरी केली आहे. या यादीत पहिल्या स्थानावर आफ्रिकेचा मार्क बाऊचर, इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि ऑस्ट्रेलियाचा टीम पेन असून या तिघांनीही 10 व्या कसोटीत यष्टीमागे 50 बळींचा टप्पा पार केला आहे.

फलंदाजीत फ्लॉप, यष्टीमागे रॉक
पंत फलंदाजीमध्ये सध्या फ्लॉप होताना दिसत आहे. विंडीज दौऱ्यावरही त्याच्याकडून अद्याप एकही मोठी खेळी खेळली गेलेली नाही. तीन डावात त्याने फक्त 19.33 च्या सरासरीने 58 धावा केल्या आहेत. परंतु यष्टीमागे मात्र तो चांगली कामगिरी करत आहे. विंडीजसह गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पंतने अॅडलेड कसोटीत यष्टीमागे 11 झेल घेतले होते.