
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात गुवाहाटीच्या बरसापाला मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने 81.5 षटकांत 6 बाद 247 धावसंख्येपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत याला मैदानावरील पंचांनी दोनदा ‘टाईम वॉर्निंग’ दिली. यामुळे पंतचा पारा चढला आणि गोलंदाजीसाठी जास्तीचा वेळ घेणाऱ्या कुलदीप यादववर तो भडकला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दुसऱ्या दिवशी आफ्रिकेचा खेळ सुरू झाला आणि 87 वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव धावत आला. तत्पूर्वी तो गोलंदाजीचा सराव करत होता. यासाठी त्याने जास्त वेळ घेतल्याने कर्णधार ऋषभ पंत चांगलाच भडकला. स्क्रीनवर सुरू असलेल्या टायमरकडे बोट दाखवत पंतने कुलदीपची चांगलीच खरडपट्टी काढली.
तत्पूर्वी वेळेत षटक सुरू न केल्यानेे दोन वेळा पंचांनी पंतला ‘टाईम वॉर्निंग’ दिली होती. अशात कुलदीप गोलंदाजीसाठी जास्त वेळ घेत असल्याने पंतचा पारा चढला. 30 सेकंदांचा वेळ आहे… घर पे खेल रहे हो क्या? स्क्रीनवर टायमर चालू असल्याचे दिसत नाही का? लवकर चेंडू टाक, असे पंत कुलदीपला म्हणाला.
आयसीसीचा नियम काय?
आयसीसीच्या नवीन नियमानुसार एखादे षटक संपल्यानंतर पुढील षटक 60 सेकंदांमध्ये सुरू करणे अनिवार्य आहे. जर यास उशीर झाला तर पंचांकडून वॉर्निंग दिली जाते. दोन वेळा अशी वॉर्निंग मिळाल्यावर तिसऱ्या वेळेलाही नियमाचे उल्लंघन झाल्यास प्रतिस्पर्धी संघाला 5 धावा पेनल्टी म्हणून दिल्या जातात. प्रत्येक 80 षटकानंतर हा नियम रिसेट होते. गुवाहाटी कसोटीत पंतला पहिली वॉर्निंग 45 व्या षटकात मिळाली होती आणि आता पुन्हा एक वॉर्निंग मिळाली. त्यामुळे पुढे त्याला काळजी घ्यावी लागेल अन्यथा दक्षिण आफ्रिकेला 5 धावा आयत्या मिळतील.



























































