नदीच्या पात्रात पडलेल्या पुतणीला वाचवताना चुलत्याचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातल्या राजूर तालुक्यातील उंचखडक खुर्द येथे प्रवरा नदीच्या पात्रात वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या आपल्या पुतणीला वाचवताना चुलत्याचाच दुर्दैवी अंत झाल्याची ह्दयद्रावक घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उंचखडक खुर्द येथे ही घटना घडली.

राजू घोडके हे अभियंता होते. राजू मुरलीधर घोडके हे आपली पुतणी संस्कृती हिला वाचविताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू पावले तर पुतणी संस्कृती घोडके हिच्यावर अकोल्यातील डॉ. भांडकोळी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे ती बचावली आहे.

याबाबत माहिती अशी की, राजू घोडके हे अभियंता असून त्यांनी अकोले, चंद्रपूर, संगमनेर आदी ठिकाणी इंजिनियर म्हणून कामगिरी बजावलेली आहे. सध्या ते संगमनेर येथील रहिवासी झाले आहेत. मात्र करोनामुळे व मुलांना सुट्टी असल्यामुळे ते आपल्या उंचखडक खुर्द या मुळ गावी आले होते. शुक्रवारी सायंकाळी ते आपल्या मुलास व पुतणीला घेऊन गावच्या प्रवरा नदीतीरावर सहज फिरायला आले होते. यावेळी त्यांची पुतणी संस्कृती नदीकाठी उभी राहून पाण्यातील मासे न्याहाळत होती. काही वेळाने मासे पाहता पाहता तिचा तोल जाऊन पाय घसरून ती नदीच्या पाण्यात पडली.

अचानकपणे तिला पाण्यात पडल्याचे पाहून राजू घोडके यांनी तिला वाचवण्यासाठी हात देण्याचा प्रयत्न केला. पण हात पुढे करूनही संस्कृतीला वाचवणे शक्य नाही हे लक्षात आले. सध्या प्रवरा नदीच्या पात्रातून उन्हाळ्याचे शेतीसाठी 1500 क्युसेकने दुसरे आवर्तन सुरू आहे. या पाण्याच्या प्रवाहात संस्कृती वाहून जावू लागल्याचे त्यांना जाणवू लागले. त्यांना पोहता येत नव्हते तरीही त्यांनी पुतणीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. दरम्यान त्यांनी पुतणीस नदीकाठाकडे ढकलण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ती नदी काठावरती आली व तशीच पडून राहिली.

पुतणीला काठावर लोटून स्वतः फिरून नदीच्या पात्रातून काठावर येत असतानाच त्यांना प्रवाहीत पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले. हा सर्व प्रकार त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या लहान मुलाने पाहिला असता त्यांने आरडाओरडा करत तो गावाकडे पळत सुटला. गावातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच अनेक जण मदतीसाठी नदीकडे धावले. काहींनी नदीत उडी मारून राजूला बाहेर काढले. यावेळी मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती तर तिचा प्राण वाचवणारे चुलते राजू घोडके हे मात्र अगोदरच गतप्राण झाले होते.

तातडीने संस्कृतीला उपचारासाठी अकोल्यात डॉ. भांडकोळी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिला वेळेत उपचार मिळाल्याने तीचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. मात्र या घटनेत अभियंता राजू घोडके यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली. घोडके यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.