
कोकणात रस्ते आणि रेल्वेनंतर आता लवकरच बोटीने जाता येणार आहे. सरकारच्यावतीने चालवण्यात येणाऱया प्रस्तावित सागरी रो-रो बोट सेवेची चाचणी आज करण्यात आली. मुंबईवरून निघालेली एम 2 एम प्रिन्सेस ही बोट जयगड बंदरात दुपारी दोन वाजता दाखल झाली. त्यानंतर ती विजयदुर्गकडे रवाना झाली. त्यामुळे लवकरच मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते सिंधुदुर्ग अशी बोटसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई ते रत्नागिरी प्रवास तीन तासांत तर मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास पाच तासांत करण्यासाठी मुंबई ते विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशी सागरी रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला होता. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्र्यांनी तशी घोषणाही विधिमंडळात केली होती. मात्र, विजयदुर्ग येथे रो-रो सेवेसाठी जेट्टी बांधण्यासाठी वेळ लागल्याने ही सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू झाली नाही. मात्र, गणेशोत्सावात ही सेवा सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, आज या बोटीची चाचणी झाल्यामुळे मुंबई ते कोकण आणि कोकण ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी कोकणवासीयांना आणखी काही काळ थांबावे लागणार आहे. गणेशोत्सवात ही रो रो सेवा सुरू होईल आणि चाकरमान्यांना झटपट आपले गाव गाठता येईल असे बोलले जात होते, परंतु प्रत्यक्षात ही सेवा सुरू न झाल्याने कोकणवासीयांचा हिरमोड झाला आहे.
कोकणवासीयांना सागरी मार्गाचा पर्याय
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षे रखडलेले आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात कोकणवासीयांना खड्डय़ांनी भरलेल्या रस्त्यांमधून जीवघेणा प्रवास करून गाव गाठावे लागते. निदान या वर्षी तरी दिलासा मिळेल, या आशेवर कोकणी माणूस वर्षामागून वर्षे हा प्रवास करत आहे. पण सरकारला त्यांची फिकीर नाही. मात्र, हा रस्ता पूर्ण करण्याऐवजी सरकारने सागरी रो-रो सेवेचा पर्याय दिला आहे.
- विजयदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रूपांतर रो-रो जेट्टीत करण्यासह इतर कामे हाती घेण्यात आली. ही कामे 20 आगस्टपर्यंत संपकत त्यानंतर रो-रो बोटीची चाचणी घेतली जाणार होती. 25 आगस्टपर्यंत ही सेवा सुरू करण्यात येणार होती. मात्र, हे कामही वेळेत पूर्ण झाले नाही.
- हवामान बदलामुळे रो रो बोटीच्या चाचण्या घेणे अशक्य होत आहे. चाचण्यांसाठी हवामान योग्य झाल्यास चाचण्या घेत रो-रो सेवा वाहतुकीसाठी खुली करू. त्याची तारीख लवकरच जाहीर करू, असे सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी यांनी सांगितले.