भरती-ओहोटीच्या तडाख्यामुळे मरीन ड्राइव्हजवळ रस्ता खचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भरती-ओहोटीच्या तडाख्यामुळे मरीन ड्राइव्हजवळ रस्ता खचला असल्याचे आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून किलाचंद चौक येथील रस्ता आत दबल्यासारखा दिसत होता. त्यामुळे पालिकेच्या रस्ते विभागाने हा भाग खोदून बघितला असता आत मोठी पोकळी असल्याचे आढळून आले आहे. पालिकेने तातडीने दुरुस्ती हाती घेतली असून मोठी दुर्घटना टळली आहे.

मरीन ड्राइव्हजवळ नेताजी सुभाषचंद्र रोड आणि वीर नरीमन रोड यांना छेदणाऱ्या किलाचंद चौकातील रस्ता गेल्या काही दिवसांपासून दबलेला दिसत होता. रस्ते विभागाने आज रस्त्याचा हा भाग खोदून पाहिला असता आत मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे आढळून आले. ‘पिझ्झा बाय द बे’ या सुप्रसिद्ध उपाहारगृहाजवळील रस्त्यावर हा खड्डा पडला आहे. पालिकेने आता या रस्त्याची दुरुस्ती हाती घेतली असून हे काम पूर्ण होण्यास दोन दिवसांचा अवधी लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

समुद्राच्या भरती-ओहोटीचा दाब पडल्यामुळे समुद्रालगतच्या  रस्त्याखालची माती वाहून गेल्यामुळे वरचा डांबरी रस्ता वाकला होता. चर्चगेट स्थानकापासून जवळच असलेल्या या रस्त्यावरून रोज व्हीआयपी वाहनांची ये-जा सुरू असते. अतिशय वेगाने दोन्ही दिशेने वाहने जात असतात. अचानक हा रस्ता खचला असता तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मात्र पालिकेने वेळीच घेतलेल्या खबरदारीमुळे ही दुर्घटना टळली आहे. डांबराच्या रस्त्यांच्या थरांखालची माती ओहोटीबरोबर वाहून गेल्यामुळे ही पोकळी निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हा रस्ता खणला असता आतमध्ये तब्बल 20 फूट खोलवर आणि 7 फूट रुंद पोकळी निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. रस्ता खणला असता दीड मीटर अंतर खोलवर जुना काँक्रीट रस्ता होता. त्याच्याही सहा फूट खाली ही पोकळी असल्याचे आढळून आले आहे. सोमवारी रात्रीपासून रस्त्यावर भरणी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून दोन दिवस हे काम चालेल.

किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ए वॉर्ड