
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रस्ते विकासाची कामे करणारे कंत्राटी कर्मचऱ्यांवर सरकारकडून अन्याय होत आहे. मानधनवाढ, कर्मचाऱ्यांना नियमित रजा आदी प्रलंबित मागण्यांबाबत आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नसल्याने रस्ते विकास कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान उपोषण सुरू केले आहे. मात्र सरकारी पातळीवरून त्याची दखल घेतली जात नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
ग्रामीण भागात रस्ते विकासाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना सरकारने दिलेल्या आश्वासनांची तीन महिन्यानंतरही पूर्तता झालेली नाही. यामुळे 22 सप्टेंबरपासून या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले असून अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नाही. वित्त विभाग तसेच ग्रामविकासमंत्र्यांच्या भेटीसाठी मागणी करूनही अद्याप भेट घेतलेली नाही. त्यातच उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी शनिवार, रविवार या दिवशी उपोषणाला बसण्याची परवानगी नाकारल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.