सांगलीतील गुन्हेगारी मोडण्यासाठी रोडमॅप; पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे ऍक्शन मोडवर

सांगली जिह्यातील गुन्हेगारी, फळकुट दादांची मक्तेदारी मोडण्यासाठी आता रोडमॅप तयार करण्यात आला आहे. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे ऍक्शन मोडवर आले आहेत. यासाठी प्रभारींच्या बैठकीत सक्त सूचना देण्यात आल्या.

गुन्हेगारांवर पाळत ठेवणे, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, गोपनीय बातमीदारांचे जाळे वाढवणे, यांसह महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिल्या. जिह्यात गेल्या काही महिन्यांत खुनाच्या घटना वाढल्या आहेत. सदरचे खून हे वैयक्तिक कारणातून झाले असले, तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिह्यात घरफोडी, खून, हाणामारी, जबरी चोरी या घटना होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी रोडमॅप तयार केला आहे. अमली पदार्थांविरोधात जिल्हा पोलीस दलाने विविध ठिकाणी छापे टाकून कोटय़वधी रुपयांचे अमली पदार्थ पकडले. आंतरराज्य तस्कर जेरबंद केले. अमली पदार्थांना जिह्यात पायबंद घालण्यात यश येत आहे.

आता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी रोडमॅप तयार केला असून, त्यांनी जिह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारींची बैठक घेत गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचे आदेश दिले आहेत. जिह्यात कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगारांची तपासणी, जेलमधून सुटलेल्या संशयितांवर गोपनीय खात्यामार्फत नजर ठेवणे, यांसह पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक मिळावी, यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

काही गुन्हे असे घडतात की, चार भिंतींच्या आताच घरगुती वादातून डोकी फोडली जातात, खून होतात, त्यामुळे गुन्हेगारी वाढते. परंतु तेथून पुढे शहरी व ग्रामीण भागातील घरगुती वादातून घडणारे गुन्हे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे दहशत माजवणारे गावगुंड, धमकी देणारी प्रवृत्ती यांची माहिती गुप्तपणे मिळावी, यासाठी एक वेगळा टास्कफोर्स तयार करण्यात येत आहे. यामुळे गंभीर गुन्हेगारीला पायबंद बसेल, हा रोडमॅपचा महत्त्वाचा मुद्दा आहे.

व्यापक मोहिमेतून ‘नशामुक्ती’चे अभूतपूर्व यश
सांगली जिह्यात तरुण मुलांमध्ये वाढलेले नशेखोरीचे प्रमाण, त्यातून वाढलेली गुन्हेगारी, हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. यातूनच नशामुक्तीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टास्कफोर्सची स्थापना केली. या नशामुक्ती अभियानामुळे तरुणवर्गाला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी पोलीस दलाने केलेले काम हा आता राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस अधीक्षक घुगे यांनी कौशल्य पणाला लावून आंतरराज्य अमली पदार्थ तस्करांचे रॅकेट उद्ध्वस्त केले. जिह्यात सुरू असणारे ड्रग्जचे कारखाने नेस्तनाबूत केले. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाची भूमिका मोलाची ठरत आहे.

गुन्हे कमी करण्यासाठी आता उपअधिक्षकांना टार्गेट
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हे दाखलचे प्रमाण कमी आहे. दरवर्षी हा आलेख कमी होत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गंभीर स्वरूपाच्या गुह्यांत घट व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. जुने गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये लवकरात लवकर चार्जशीट न्यायालयात दाखल करून शिक्षा लागावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गुह्यात शिक्षा लागली की गुन्हेगारीवर एकप्रकारे नियंत्रण मिळवल्यासारखे आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हे निर्गती करण्यासाठी तसेच कठोर कारवाईसाठी उपअधीक्षकांना टार्गेट दिले आहे, असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.