पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार भाजलेले चणे, शेंगदाणे

276

मुंबई महापालिकेने पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाजलेले चणे आणि शेंगदाणे पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला. मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव काही कारणास्तव मागे घेतला. हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी आणला जाईल स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे समजते.

पालिकेने काही वर्षांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांसाठी पूरक आहार म्हणून सुगंधित दूध पुरवठा योजना राबवली होती. त्याच धर्तीवर पालिकेच्या शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना भाजलेले चणे आणि शेंगदाणे पुरवण्यात येणार आहेत. यासंदर्भात पालिका शिक्षण विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. पाचवीच्या विद्यार्थ्यांना 30 ग्रॅम भाजलेले चणे 30 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे देण्याचा प्रस्ताव आहे, तर सहावी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना 45 ग्रॅम भाजलेले चणे आणि 45 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे दिले जाणार आहेत. हा प्रस्ताव गुरुवारी काही कारणास्तव मागे घेण्यात आला. मात्र मंजुरीसाठी पुन्हा हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आणला जाईल मंजुरी मिळाली की अंमलबजावणी केली जाईल, असे समजते.

96 कोटींची योजना

विद्यार्थ्यांना भाजलेले चणे, शेंगदाणे पुरवण्याच्या योजनेवर एकूण 96 कोटी 70 लाख 2 हजार 960 रुपये खर्च केले जाणार आहेत. कंत्राटदार मे. छेडा स्पेशालिटीज प्रा.लि. यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना या चणेशेंगदाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या