
सामना प्रतिनिधी, भिवंडी
शहरात एकाच रात्री चार घरफोडय़ा करून चोरटय़ांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरटय़ांचा रात्रीस खेळ सुरू असल्यामुळे भिवंडीकरांची झोप मात्र उडाली आहे. पहिली घटना कामतघर येथील हनुमान मंदिरालगत घडली.
येथे राहत असलेले मंडप डेकोरेटर्स रंगनाथ चित्तेवार यांच्या घराच्या स्लायडिंग खिडकीतून चोरटय़ाने प्रवेश करून कपाटातील 45 हजार 597 रुपये किमतीचे पावणेदोन तोळ्याचे सोन्याचे दागिने व 3 मोबाईल तसेच 22 हजारांची रोख रक्कम असा 67 हजार 597 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
कऱ्हाळदेवी हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या लक्ष्मीकांत गुजा यांच्या घरात चोरी झाली. तिसऱ्या घटनेत नदीनाका पोलीस चौकीसमोरील राहणाऱ्या मुमताजबानो शेख यांच्या घराच्या पोटमाळ्याच्या खिडकीचा पडदा फाडून चोरटय़ाने कपाटातील 1 लाख 62 हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. चौथी चोरी सरवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इन्फोटेक ऑटो मेन्शन प्रा.लि. कंपनीत झाली.



























































