कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एम) या गावाजवळ स्वीफ्ट मोटार अडवून चोरटय़ांनी चाकूच्या धाकाने प्रवाशांना लुटले. चोरटय़ांनी रोख रक्कम, मोबाईल असा 27 हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तासगाव तालुक्यातील उपळावी येथील सागर संपत पाटील हे स्विफ्ट गाडीतून अलकुड (एम) ते करोली (एम) रस्त्याने रात्री जात असताना अज्ञात चार चोरटय़ांनी चाकूचा धाक दाखवून 27 हजार रुपयांचा ऐवज लुटला. सदरची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. दोन अनोळखी इसमांनी तोंडाला मास्क लावून, रस्त्यावर दुचाकी आडवी लावून संपत पाटील यांची गाडी रोखली. त्याचवेळी टेकडीवरून आणखी दोघेजण आले. चौघांनी सागर पाटील यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील ऐवज लुटून अंधाराचा फायदा घेत पळून गेले. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एक महिन्यात लुटीच्या चार घटना
z कवठेमहांकाळ शहरानजीक तीन दिवसांपूर्वी एका वृद्धेच्या घरात घुसून अज्ञात चोरटय़ांनी सोने लुटले होते. शेळकेवाडी येथे पंधरा दिवसांपूर्वी चोरटय़ांनी पॉलीश करण्याच्या बहाण्याने सोने लुटून नेले होते. तर, आरेवाडी व केरेवाडी येथे दरोडा पडून अवघे 27 दिवस झाले आहेत. यातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकंदरीत एक महिन्याच्या कालावधीत चार ठिकाणी सोने लुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत.