आता केसांवरही दरोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि ऐवजावर डल्ला मारल्याचे काही नवल नाही पण या चोरट्यांनी चक्क डोक्यावरचे केस लंपास केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? नागपूर-हैद्राबाद मार्गावरील रूईखैरी भागात आलेले दरोडेखोर चक्क 79 किलो केस घेऊन पसार झाले. चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांना काहीच मिळाले नाही म्हणून त्यांनी चक्क केसांवरच डल्ला मारला.

आंध्रप्रदेशातील रंगारेड्डी येथे राहणाऱ्या प्रदीप नेरला यांचा केसांचा व्यवसाय आहे. त्यांनी नागपूरातून 15 हजार रूपयांचे 79 किलो केस खरेदी केले. केस घेऊन ते कारने हैद्राबादकडे जात होते. रूईखैरी भागात त्याच्या कारसमोर एक कार आडवी आली. कारमध्ये असलेल्या पाचपैकी एका जणाने प्रदीप यांना कारमधून बाहेर काढले. त्याला मारहाण करून ढकलून दिले आणि कार व 79 किलो केस घेऊन ते दरोडेखोर पसार झाले.

प्रदीपने कसेबसे बुटीबोरी पोलिस स्टेशन गाठले. कारमध्ये फक्त केस असल्याचे प्रदीपने सांगताच पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रदीपच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बुटीबोरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.