
स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा पडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बँकेत घुसून एक कोटींची रोकड आणि 20 किलो सोने लुटून पोबारा केला. दरोडेखोरांनी तोंडाला मास्क लावला होता. कर्मचाऱ्यांना चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत बँक लुटली. कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील एसबीआय शाखेत ही घटना घडली. दरोडेखोर निघून गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी विजयपुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला.
विजयपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तीन दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडचन शाखेत घुसून कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवत रोकड आणि सोने लुटले. गुन्हेगारांनी बनावट नंबर प्लेट असलेली कार गुन्ह्यात वापरली असून दरोडा टाकल्यानंतर ते महाराष्ट्रातील पंढरपूरच्या दिशेने पळून गेल्याचे विजयपुराचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी सांगितले. याप्रकरणी बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे.