
सामना ऑनलाईन, पुणे
सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या घरात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरटय़ाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली.
जितसिंग राजपाल सिंग टाक (२४, रा. बिराजदार नगर, वैदुवाडी, हडपसर) असे चोरी करणाऱयाचे नाव आहे. भांडारकर रस्त्यावरील ‘मालती माधव’ या सोसायटीमधील पु. ल. देशपांडे यांच्या घरात १८ डिसेंबर २०१७ रोजी मध्यरात्री चोरटय़ांनी कुलूप तोडून चोरी केली होती. चोरटय़ांनी पु. लं. च्या घरातील कपाटे उचकटून मौल्यवान ऐवज शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना पुस्तकांमधील ‘शब्दरूपी सोने’ याचे महत्व न कळाल्याने त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते.
‘पुलं’च्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस येताच सर्वत्र खळबळ उडाली. यापूर्वी १२ एप्रिल २०१७ रोजही ‘पुलं’च्या घरात चोरी झाली होती. दुसऱयांदा असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी महेश आरस यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जितसिंग टाक याने ‘पुलं’च्या घरी चोरीचा प्रयत्न केला असून, तो निगडी येथे क्रिकेट खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. त्याच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन, बंडगार्डन एक येथील घरफोडीचे आणि भोसरीतील एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. त्याच्याकडून ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.






























































