लिफ्ट देऊन नागरिकांना लुबाडणारी टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पायी जाणाऱ्या नागरिकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून लुबाडणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांनी केलेले जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. दौंड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार उर्फ काका महेंद्र गावडे (वय 21, रा.बेटवाडी, होलेमळा ता.दौंड), राजेश संभाजी बिबे (वय 19, रा.गिरीम ता.दौंड मूळ रा.माळेवाडी ता.जि.बिड), अजय ज्ञानेश्वर पवार (वय 19,रा.लोणीकाळभोर) आणि विशाल दिलीप आटोळे (वय 24, वर्षे रा.गोपाळवाडी , गोकुळनगर ता.दौंड ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 डिसेंबर रोजी संजय मुनोत यांना दौंड येथे जाण्यासाठी दुचाकीवरून लिफ्ट देतो असे सांगत एक अनोळखी इसम त्यांना घेऊन जात होता. त्यानंतर एका निर्मनुष्य ठिकाणी नेत त्यांच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम दोन सोन्याच्या अंगठ्या, घड्याळ असा 1 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना कुरकुंभ येथे काही आरोपी चोरीचे सोने विकण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यानी दौंड परिसरात जबरी चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 2 लाख 26 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने केली आहे.