
चीनची राजधानी बीजिंगमध्ये रोबोट मॉल नावाने एक आगळेवेगळे स्टोअर उघडण्यात आले आहे. या मॉलमध्ये ग्राहकांना थेट रोबोटची खरेदी करता येणार आहे. या रोबोट मॉलमध्ये अगदी माणसासारखे दिसणारे, रोबोट्स खरेदी करता येत आहेत. या रोबोटमध्ये जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे 100 हून अधिक प्रकारचे वेगवेगळ्या किमतीतील रोबोट विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणचे ह्युमनॉईड्स रोबोट हे सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील बरेचशे रोबोट हुबेहूब माणसासारखे आहेत. त्यांना ओळखणेही कठीण जाते. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यासारखा दिसणारा रोबोट त्यांच्यासारखाच आवाज काढतो, हावभाव करतो. या मॉलमध्ये एका रोबोट्सची किंमत 2 हजार युआन म्हणजेच 23 हजार 500 रुपयांपासून सुरू होते. काही रोबोट्सची किंमत लाखांच्या घरात तर काहींची किंमत थेट एक-दोन कोटी रुपयांपर्यंत आहे.
ह्युमनॉईड रोबोट गेम्स
चीनमध्ये 14 ते 17 ऑगस्टदरम्यान वर्ल्ड ह्युमनॉईड रोबोट गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये 20 हून अधिक देश सहभागी होणार आहेत. यात ट्रक अॅण्ड फिल्ड, डान्स आणि फुटबॉल यासारख्या स्पर्धांमध्ये रोबोट्स भाग घेतील. रोबोट मॉलचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर चीनमध्ये पाच दिवसांची वर्ल्ड रोबोट कॉन्फरन्स करण्यात आली. यामध्ये 200 हून अधिक देशविदेशी कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तसेच 1500 हून अधिक रोबोटिक उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले होते.