संजय शिरसाट यांनी पाच हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा रोहित पवार यांचा आरोप; उद्या सिडकोवर मोर्चा

सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट यांनी सिडकोची पाच हजार कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन नियमबाह्यरीत्या बिवलकर कुटुंबाच्या घशात घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज केला. याप्रकरणी रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी संजय शिरसाट यांचा राजीनामा न घेतल्यास उद्या (बुधवारी) महाविकास आघाडीच्या वतीने नवी मुंबईतील सिडकोवर सकाळी 11 वाजता मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

मराठा साम्राज्याच्या विरोधात मदत केल्याप्रकरणी ब्रिटिशांनी बिवलकर कुटुंबाला रोहा, पनवेल, उरण, अलिबाग या तालुक्यातील 15 गावांतील सुमारे चार हजार एकर जमीन राजकीय इनाम म्हणून दिली. मात्र, त्यानंतर सरकारने केलेले विविध कायदे, नियमानुसार ही जमीन सरकारजमा झाली.  तरीही  बिवलकर कुटुंबाने सातत्याने जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न  केला. 1975 साली खासगी वन संपादन कायदा आल्यानंतर ही जमीन सरकारकडे गेली. या निर्णयाला बिवलकर कुटुंबाने हरकत घेऊन उच्च न्यायालयात आव्हान दिले. राज्य सरकार आणि सिडकोकडून प्रभावीपणे बाजू मांडण्यात आली नसल्याने न्यायालयाने बिवलकर कुटुंबाच्या बाजूने निर्णय दिला. राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

बॅगेचे रहस्य सिडको घोटाळय़ात

शिरसाट यांच्या घरी सापडलेली पैशांची बॅग, नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर येथे घेतलेली जमीन, एमआयडीसी क्षेत्रातील भूखंड याचे रहस्य सिडकोच्या जमिनीत आहे, असा आरोप करत पवार यांनी शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली.